
मध्य रेल्वेने आपल्या लांबपल्ल्याच्या गाडय़ांना जीपीएस यंत्रणेवर व्हेईकल ट्रकिंग सिस्टीम बसविल्यानंतर आता अपघात काळात बचावासाठी धावणार्या ‘एआरटी’ म्हणजेच ऍक्सिडेंट रिलीफ ट्रेनलाही ‘जीपीएस’ यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या महाराष्ट्रभर पसरलेल्या जाळ्यानुसार कोठेही काही अपघात झाल्यास ‘एआरटी’ ट्रेनचे लोकेशन समजून तातडीने ‘गोल्डन अवर’मध्ये प्राण वाचविण्यासाठी हालचाली करणे सोपे होणार आहे.
याआधी अशा आपत्कालीन परिस्थितीत ऍक्सिडेंट रिलीफ व्हेईकल मदत घेऊन किती वेळात पोहचेल हे सांगणारी कोणतीही यंत्रणा अस्तित्वात नव्हती. केवळ मानवी माहितीवर आधारित निर्णय घेतले जात होते. त्यात प्रसंगी मानवी चुकांना वाव होता. ही अपघात मदत गाडी कुठपर्यंत पोहचली आहे ते मोबाईलवरच पलीकडून व्यक्ती जी माहिती सांगेल त्यावरच पुढील निर्णय घ्यावे लागत होते. एखाद्या वेळी हे वाहन उशिरा का पोहचले याची जबाबदारी कोणावरही निश्चित करता येत नव्हती अशी माहिती सूत्रांनी दिली.
कुर्ला (2), कल्याण (3), लोणावळा (1), पनवेल (1) आणि इगतपुरी (2) आणि नागपूरच्या भुसावळ डिव्हिजनमध्ये सात अशा एकूण 13 एआरटी वाहनांमध्ये जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली आहे. प्रत्येक ‘एआरटी’ वाहनात 16 जीबी इंटर्नल मेमरीची जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली आहे. तसेच 12000 ते 16000 जीपीएस लोकेशन डाटा रेकॉर्ड सामावण्याची त्याची क्षमता आहे. गुगल मॅप आणि मोबाईल ऍपवर रिअल टाइम मॉनिटरिंग करणे त्यामुळे शक्य होणार आहे.
‘एआरटी’ व्हेईकल म्हणजे काय?
या अपघात बचाव ट्रेनमध्ये अपघातस्थळी मदतीसाठी असणारी सर्व यंत्रणा सुसज्ज ठेवण्यात आलेली असते. मोठय़ा क्रेन, गॅस कटर, तसेच डॉक्टरांचे पथकही सुसज्ज ठेवलेले असते. सर्व अपघात बचाव गाडय़ांना जीपीएस यंत्रणा बसविल्याने सर्व गाडय़ांचे नेमके ठिकाण मोबाईल फोनद्वारे किंवा वेबसाईटद्वारे अचूकपणे समजण्यास मदत होणार आहे. त्यामुळे बचाव पथक कितव्या मिनिटाला घटनास्थळी पोहचेल हे समजणे सोपे होणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली.
























































