
दहशतवाद्यांच्या नेहमीच निशाण्यावर असलेल्या देशाची आर्थिक राजधानी मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकासारखी गर्दीची स्थानके आता रासायनिक हल्ल्यापासून कशी सुरक्षित करायची यासाठी रेल्वे सुरक्षा दलाला प्रशिक्षण देण्यासाठी डिफेन्स रिसर्च ऍण्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन अर्थात ‘डीआरडीओ’चे पथक मुंबईत दाखल झाले आहे. हे पथक सीएसएमटीसारख्या मोठ्या स्थानकांची पाहणी करून रेल्वे सुरक्षा बलाला आपला अहवाल देणार आहे.
26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात सीएसएमटी स्थानकाला अतिरेक्यांनी लक्ष्य केले होते. त्यामुळे या स्थानकांवर जर अतिरेक्यांनी रासायनिक हल्ला केला तर काय उपाययोजना कराव्यात, कोणते रासायनिक पदार्थ स्थानकांत घेऊन कोणी शिरकाव केला तर त्याला कसे पकडावे, असे रासायनिक पदार्थ कसे ओळखावेत, अशा रासायनिक पदार्थांना ओळखणारे स्कॅनर कोणते आहेत याचे मार्गदर्शन ‘डीआरडीओ’चे अधिकारी करणार आहेत. यासाठी रेल्वे सुरक्षा बलाच्या 30 जवानांना तसेच अग्निशमन दलाच्या पाच जवानांना विशेष प्रशिक्षण देण्यात येईल.
अनेक धोक्यांपासून संरक्षण कसे करायचे याचे धडे
सध्या रेल्वे स्थानकांत असलेल्या बॅगेज स्कॅनरद्वारे रासायनिक घटकांना ओळखता येत नाही. परंतु रासायिक पदार्थांना ओळखणारे स्कॅनर उपलब्ध असून त्यांची उभारणी रेल्वे स्थानकांत करण्याविषयी चाचपणी करण्यात आली आहे. क्लोरिन, अमोनियासारख्या हवेत पसरणार्या वायूपासून संरक्षण कसे करायचे, रासायनिक हल्ल्यापासून बचावाचे जॅकेट तसेच सूट, मास्क यांचीही माहिती देण्यात आली आहे. रासायनिक हल्ल्यासाठी अतिरेकी सेंट्रल एसीसारख्या वातानुकूलित यंत्रणेचा वापर करू शकतात. म्हणून त्यापासून बचाव कसा करायचा, रासायनिक हल्लाबाधित व्यक्तीपासून दुसर्याना संसर्ग होऊ नये यासाठी त्याला पाण्याच्या शॉवर खालून नेऊन त्याला स्वच्छ करणारे केंद्र तयार करण्यापासूनच्या अनेक योजनांची माहिती ‘डीआरडीओ’ने रेल्वे सुरक्षा बलाला दिली आहे.



























































