
शासनाच्या आदेशानुसार प्लॅस्टिक बंदीची कठोर अंमलबजावणी महापालिकेकडून केली जात असून दररोज 20 ते 30 हजारांचा दंड वसूल केला जात आहे. गेल्या आवठडाभरात सव्वादोन लाख रुपयांचा दंड स्वच्छता निरीक्षकांनी वसूल केला आहे. सुमारे 70 ते 80 जणांवर अद्यापपर्यंत कारवाई करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी मनपा आयुक्त पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर प्लॅस्टिक बंदीच्या कारवाईला प्राधान्य देऊन कारवाईचे आदेश दिले होते. सर्व स्वच्छता निरीक्षकांना त्यांनी याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार 4 डिसेंबरपासून महापालिकेने 50 मायक्रॉनपेक्षा कमी असलेले प्लॅस्टिक वापरणार्यांवर कारवाईला सुरुवात केली आहे.
घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख तथा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, मुख्य स्वच्छता निरीक्षक राजकुमार सारसर व परीक्षित बीडकर यांच्या नेतृत्वाखाली शहरात सर्वत्र तपासणी करण्यात येत आहे. भाजी विक्रेते, शॉपिंग मॉल, मोठी दुकाने आदी विविध व्यावसायिक आस्थापनांसह काही नागरिकांवरही कारवाई करण्यात आली आहे. प्लॅस्टिक बंदीसह इतर कारवायाही केल्या जात असून, आठवडाभरात घनकचरा व्यवस्थापन विभागाने 2 लाख 22 हजार 650 रुपये दंड वसूल केला असल्याचे मुख्य स्वच्छता निरीक्षक राजकुमार सारसर यांनी सांगितले.

























































