
महापालिकेच्या अर्थसंकल्पास मंजुरी देण्यासाठी बोलावण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाआघाडीच्या मंत्रिमंडळाचे अभिनंदन टाळण्यासाठी भाजपच्या नगरसेवकांनी राजीनामानाटय़ घडवले. उपमहापौर विजय औताडे यांनी आपला राजीनामा आयुक्तांकडे सूपूर्द केला. मात्र एवढय़ा नाटकबाजीनंतरही सभागृहाने एकमताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महाआघाडीचे मंत्रिमंडळ आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर केला.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची निवड झाल्याबद्दल सभागृह नेता विकास जैन यांनी मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला, तर राजेंद्र जंजाळ यांनी मुख्यमंत्र्यांसह महाआघाडीच्या मंत्रिमंडळाचे व विरोधी पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडून मूळ ठरावास अनुमोदन दिले. मात्र हा ठराव मांडला जाताच भाजपच्या नगरसेवकांनी थयथयाट केला.
शिवसैनिकांच्या मनातील मुख्यमंत्री विराजमान
माजी महापौर त्र्यंबक तुपे म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांच्या मनातील मुख्यमंत्री आहेत. तेव्हा मन मोठे करून तुम्ही अभिनंदनाच्या ठरावाला पाठिंबा देणे अपेक्षित होते. परंतु मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळाचे अभिनंदन करण्यास तुमचा विरोधच असल्याचे दिसून येत आहे. यावर भाजपच्या नगरसेवकांनी पुन्हा गोंधळ घातला. या गोंधळात विजय औताडे यांनी उपमहापौरपदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. दरम्यान, महापौर नंदकुमार घोडेले यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या तसेच मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात येत असल्याचे जाहीर केले तेव्हा शिवसेना, कॉग्रेस, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी बाके वाजवून अभिनंदन केले.



























































