
सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाचा भडका देशभर उडाला असून राजधानी दिल्लीतील जामिया मिलिया विद्यापीठात रविवारी पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीहल्ल्यामुळे देशभरातील विद्यापीठांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. दिल्लीपासून मुंबईपर्यंत विद्यार्थ्यांची आंदोलने सुरू आहेत. लखनौत विद्यार्थ्यांवर सोमवारी पोलिसांनी लाठीमार केला. आंदोलकांनी दगडफेक केली. कोलकाता येथे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड आंदोलन करण्यात आले. दिल्लीत ‘इंडिया गेट’ येथे काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी-वढेरा यांनी धरणे आंदोलन केले. दरम्यान, देशात अनेक प्रमुख शहरांमध्ये पोलीस बंदोबस्त वाढविला आहे.
गृहमंत्रालयाची राज्यांना सूचना
हिंसक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी एक ऍडवायजरी जारी केली आहे. फेक न्यूज आणि सोशल मीडियावर पसरविण्यात येणार्या अफवांवर रोख लावला. दोषींवर तत्काळ कारवाई करावी, तसेच राज्यांमध्ये हिंसाचार राखण्यासाठी पावले उचलण्याच्या सूचना दिल्या आहेत.
कुठे पडसाद उमटले
ईशान्य हिंदुस्थानातील आसाम, त्रिपुरासह मणिपूर, मिझोराम, अरुणाचल प्रदेशात गेल्या सात दिवसांपासून तणाव कायम आहे. आसाम, त्रिपुरात रेल्वेस्टेशन अद्याप बंदच आहे. सर्वत्र लष्करी जवानांचा बंदोबस्त आहे.
रविवारी जामिया मिलिया विद्यापीठात घुसून दिल्ली पोलिसांनी लाठीहल्ला केला. त्याचे पडसाद सोमवारीही उमटत आहेत. जामिया मिलियासह जेएनयू, दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी बंद पुकारला आहे.
लखनौत विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. विद्यार्थ्यांनी दगडफेक केली. पोलिसांनी लाठीहल्ला केला.
हिंसाचार तत्काळ थांबवा; नंतरच सुनावणी – सुप्रीम कोर्ट
नागरिकत्व कायद्यावरून सुरू असलेल्या हिंसाचाराची गंभीर दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होत आहे. बसेस जाळल्या जात आहेत. हे हिंसाचार तत्काळ थांबवा, असे अवाहन सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने आज केले. ज्येष्ठ विधिज्ञ इंदिरा जयसिंग आणि कोलीन गोन्सालवीस यांनी जामिया मिलिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याकडे लक्ष वेधत सुप्रीम कोर्टाने यावर तत्काळ सुनावणी घ्यावी अशी मागणी आज केली. त्यावर सरन्यायाधीश बोबडे यांनी आपली भूमिका मंडली. ‘आम्ही कोणाला दोषी ठरवत नाही पण प्रथमदर्शनी हा प्रश्न कायदा-सुव्यवस्थेचा आहे. पोलिसांनीच हिंसाचार रोखला पाहिजे. सुप्रीम कोर्टाने जर या प्रकरणी सुनावणी घ्यावी असे वाटत असेल तर हिंसाचार थांबला पाहिजे’, असे अवाहन सरन्यायाधीशांनी केले.
विद्यार्थ्यांवरील हल्ला ही मोदी सरकारच्या अंताची सुरुवात
विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांनी अमानुषपणे लाठीमार केला आहे. भाजपच्या अहंकारामुळे सुरू झालेले हे दमनचक्र म्हणजे मोदी सरकारच्या अंताची सुरुवात आहे अशी टीका काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली. विद्यार्थी शक्ती, युवा शक्ती जेव्हा जागृत होते तेव्हा देशात परिवर्तन होते असे त्या म्हणाल्या. देशात शांतता प्रस्थापित करणे, कायदा-सुव्यवस्था राखणे आणि देशाच्या संविधानाचे संरक्षण करणे हे सरकारचे काम आहे; पण मोदी सरकार देशवासीयांवरच हल्ले करीत आहे, असे सोनिया गांधी यांनी सांगितले.
हिंमत असेल तर अमित शहांनी ईशान्य राज्यांत जाऊन दाखवावे!
गृहमंत्री अमित शहा यांनी ईशान्येकडील दौरा रद्द केला. हिंमत असेल तर अमित शहांनी ईशान्येकडील राज्यांमध्ये जाऊन दाखवावे, असे आव्हान सोनिया गांधींनी दिले आहे.
आपल्यामध्ये फूट पडू देऊ नका; शांतता राखा
सुधारित नागरिकत्व कायद्यामुळे देशातील कुठल्याही धर्माच्या नागरिकांचे नुकसान होणार नाही. त्यामुळे घाबरू नका, अफवांना बळी पडू नका. आपल्यामध्ये फूट पडू देऊ नका, शांतता राखा, असे अवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. हा हिंसाचार दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. वाद, चर्चा आणि विरोध हा लोकशाहीचा महत्त्वाचा भाग आहे; पण हिंसाचार करणे ही आपली परंपरा नाही, असेही पंतप्रधानांनी ट्विटद्वारे म्हटले आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी कुणालाही आपल्यामध्ये फूट पाडू देऊ नका. चुकीच्या माहितीपासून आणि अफवा पसरविणार्यांपासून सावध राहा, असा सल्लाही पंतप्रधान मोदींनी दिला आहे.
प्रियंका यांचे ‘इंडिया गेट’वर धरणे आंदोलन
जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात पोलिसांनी विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठीमाराच्या विरोधात काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी-वढेरा यांनी राजधानी दिल्लीतील ‘इंडिया गेट’वर धरणे आंदोलन केले. यावेळी अनेक काँग्रेस नेते, कार्यकर्ते सहभागी झाले होते. सायंकाळी 6 वाजता हे आंदोलन सुरू झाले. दोन तासांनंतर पत्रकारांशी बोलताना प्रियंका गांधी-वढेरा यांनी मोदी सरकारवर टीका केली. सरकारच्या चुकीच्या कृतीमुळे संविधानाला धक्का बसला आहे. तरुण हा देशाचा आत्मा आहे, मात्र मोदी सरकारने या देशाच्या आत्म्यावरच हल्ला केला आहे. आंदोलन करण्याचा विद्यार्थ्यांना अधिकार आहे. पोलिसांनी ग्रंथालयात प्रवेश करून, बाहेर ओढून विद्यार्थ्यांना मारहाण केली. ही जुलूमशाही आहे, असे त्यांनी सांगितले.
























































