मुंबईकरांचे स्वेटर, जॅकेट बाहेर… पहाटे हुडहुडी, दिवसाही झोंबतो गारवा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एरव्ही दिवाळीतच शेकोटी पेटवायला लावणाऱ्या थंडीने यंदा अर्धा डिसेंबर महिना संपल्यानंतर चोरपावलांनी मुंबईत शिरकाव केला आहे. ‘थंडी गेली कुठे?’ असा चौकाचौकात, गल्लोगल्लीत प्रश्न करणाऱ्या मुंबईकरांना या थंडीने सोमवारी पहाटेपासून चांगलीच हुडहुडी भरवण्यास सुरुवात केली आहे. किंबहुना, दिवसाही शहरात थंड वारे वाहू लागल्याने मुंबईकर सुखावले आहेत.

express-train-mumbai-winter

ऑक्टोबर महिना सुरू झाला की, मुंबईकर गुलाबी थंडीच्या जणू स्वागतासाठीच सज्ज झालेले असतात. स्वेटर आधीच खरेदी केलेले असते. यंदा मात्र जास्त दिवस मुक्कामी राहिलेल्या पावसाने थंडीच्या आगमनाला उशीर केला. अखेर डिसेंबरच्या मध्यावर रविवारी थंडीने मुंबईत चोरपावलांनी एण्ट्री केली. सोमवारी या थंडीची तीक्रता वाढल्यामुळे मुंबईकरांना पहाटे चांगलीच हुडहुडी भरली. हवामान खात्याकडील नोंदीनुसार, सोमवारी कुलाब्यात सरासरीपेक्षा कमी म्हणजेच 20.5 अंश तर सांताक्रुझमध्ये 19.8 अंश इतके किमान तापमान होते. रविवारीही कुलाब्यात किमान आणि कमाल तापमानात जवळपास 1.8 अंशांची घट झाली होती. गुलाबी थंडीची वाट पाहणारे मुंबईकर तापमानात सलग दुसऱ्या दिवशी घट झाल्यामुळे सुखावून गेले आहेत.

दोन दिवसांत तापमान झपाटय़ाने घटणार
पुढील दोन-तीन दिवसांत मुंबईचे किमान तापमान झपाटय़ाने घटणार आहे. ही घट दोन ते तीन अंशांची असेल, असे कुलाबा येथील प्रादेशिक हवामानशास्त्र्ा विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. मुंबई शहर आणि उपनगरांत थंडी दाखल झाली आहे. आतापर्यंत तापमानात तितकीशी घट झाली नसली तरी पुढील दोन दिवसांत थंडीची तीक्रता आणखी वाढेल, असे संबंधित अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. उत्तर हिंदुस्थानातील पाऊस आणि बर्फवृष्टीने मुंबईकडे उत्तरेकडून वाहत येणाऱ्या थंड वाऱ्याची दिशा बदलली, असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले.