
जम्मू-कश्मीर येथील राजौरी सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना झालेल्या चकमकीत गडहिंग्लज तालुक्यातील सुपुत्र व 6 मराठा लाइट इफ्रंट्रीचे जवान हवालदार जोतिबा गणपती चौगुले (37) यांना वीरमरण आले. आज सकाळी उंबरवाडी, महागाव, ता. गडहिंग्लज येथे त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. शहीद जोतिबा चौगुले यांच्यामागे पत्नी यशोदा आणि अथर्व (9) व हर्षद (3) ही दोन मुले आहेत.
जवान जोतिबा चौगुले यांचा जन्म 23 सप्टेंबर 1982 रोजी झाला असून ते 5 एप्रिल 2002 रोजी सैन्य दलात दाखल झाले होते. सध्या जम्मूमध्ये राजौरी येथे ते सेवा बजावत होते. सोमवारी पहाटे पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना ते शहीद झाले. शहीद जोतिबा यांचे पार्थिव पुणे विमानतळ येथे दाखल होणार आहे. तेथून विमानाने कोल्हापुरात आणण्यात येणार आहे. त्यानंतर रस्तामार्गाने पार्थिव उद्या (दि. 17) सकाळी मूळ गावी उंबरवाडी, महागाव येथे दाखल होणार आहे.




























































