
महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ व महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघाच्या शिष्टमंडळाने बारामती येथे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन साखर कामगारांच्या प्रश्नांवर चर्चा केली. साखर कामगार पगार वाढीसाठी त्रिपक्ष समिती स्थापन करणे, कामगारांचे थकीत वेतन व प्रलंबित प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
या प्रश्नासाठी मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर सहकार मंत्री, कामगार मंत्री, साखर संघाचे अध्यक्ष, साखर आयुक्त, कामगार आयुक्त व कामगार सचिव यांच्या उपस्थितीत संघटनेच्या पदाधिकार्यांच्या उपस्थितीत संयुक्त बैठक घेऊन प्रश्न सोडविण्याचे आश्वासन शरद पवार यांनी शिष्टमंडळाला दिले. या बैठकिस स्वत: उपस्थित राहणार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ व महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघाच्या वतीने कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नगर, परभणी, हिंगोली, सोलापूर आदी जिल्ह्यात साखर कामगार मेळावे घेतले. या प्रश्नांबाबत साखर कामगारांमध्ये प्रचंड असंतोष असल्याचे शरद पवार यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. पवार यांनी राज्यातील साखर कामगारांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिल्याने साखर कामगारांमध्ये समाधानचे वातावरण निर्माण झाल्याची माहिती महासंघाचे सहचिटणीस कॉ.आनंदराव वायकर यांनी दिली. साखर कामगारांच्या एकजुटीने त्यांचे प्रश्न सुटणार असल्याचे प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे यांनी सांगितले. यावेळी प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे, कार्याध्यक्ष राऊ पाटील, महासंघाचे सहचिटणीस कॉ.आनंदराव वायकर, कार्याध्यक्ष शिवाजी औटी, शिवाजी शेटे, रावसाहेव भोसले, प्रदीप शिंदे, राजेंद्र तावरे, प्रदीप वनगे आदींसह या दोन्ही राज्यव्यापी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.



























































