
देशाच्या व राज्याचा सागरी हद्दीत एलईडी लाईट मासेमारी बंदी असताना महाराष्ट्र राज्याच्या सागरी हद्दीत अवैधरित्या एलईडी लाइटद्वारे मासेमारी केल्याप्रकरणी गोवा राज्यातील ट्रॉलर्सवर मत्स्यविभागाकडून कारवाई सुरू आहे. कारवाई केलेले दोन ट्रॉलर सध्या मालवण बंदरात मत्स्य विभागाच्या ताब्यात आहेत.
दरम्यान, अवैधरीत्या एलईडी लाइटद्वारे मासेमारी करणाऱ्या नौकांचा मूळ मासेमारी परवाना व नौका नोंदणी प्रमाणपत्र रद्द करावे. असा शासन निर्णय निर्गमित आहे. तरी या शासनिर्णयानुसार मत्स्य विभागाने व प्राधिकृत दंडाधिकारी (तहसीलदार) यांनी ट्रॉलर्सचा मासेमारी परवाना व नोंदणी प्रमाणपत्र रद्द करावेत. संबंधित अधिकाऱ्यांना तसे आदेश देण्यात यावेत अशी मागणी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी मत्स्यव्यवसाय तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली आहे. शासनाने 18 नोव्हेंबर 2019 रोजी अवैधरीत्या एलईडी लाइटद्वारे मासेमारी करणाऱ्या नौकांना महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 च्या कलाम 6 अन्वये देण्यात आलेला मासेमारी परवाना रद्द कारण्याबाबत कारवाई करण्यात यावी. नोंदणी प्रमाणपत्र निलंबित अथवा रद्द करण्याची कार्यवाही तात्काळ करण्यात यावी. असा शासननिर्णय निर्गमित आहे.
असे असताना मालवण समुद्रात परराज्यातील नौकांद्वारे अवैधरित्या एलईडी लाईट मासेमारी सुरू आहे. आठ दिवसात गोवा येथील दोन एलईडी बोटींवर कारवाई करण्यात आली आहे. या बोटींवर कठोर कारवाई व्हावी या आमदार वैभव नाईक यांच्या मागणींनंतर मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मत्स्य विभागाच्या आयुक्तांना याबाबत नियमानुसार योग्य ती कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती आमदार वैभव नाईक यांच्या संपर्क कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे.




























































