
बहुप्रतीक्षित असा विद्याविहार पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या रेल्वे पुलाचे बांधकाम 2020 वर्षाच्या शेवटी पूर्ण होईल अशी माहिती मुंबई महापालिका प्रशासनाने माहिती अधिकाराखाली दिली आहे. सद्यस्थितीत नाला रुंदीकरण आणि पुलाच्या पायाचे काम सुरू आहे, असेही पालिका प्रशासनाने म्हटले आहे.
या प्रकल्पाची एकूण किंमत 88 कोटी 42 लाख 49 हजार 110 रुपये इतकी असून आयआयटी मुंबईतर्फे तपासण्यात आलेले पुलाचे डिझाईन आणि ड्रॉइंग असलेले नकाशे जमा करण्याच्या सूचना मध्य रेल्वेचे मंडळ अभियंता पी. के. गुप्ता यांनी मुंबई महापालिका प्रशासनाला दिल्या आहेत. याप्रकरणी आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई महापालिका प्रशासनाकडे विद्याविहार रेल्वे पुलाची माहिती आरटीआय कायद्याअंतर्गत मागवली होती. दरम्यान, इलेक्ट्रिकलचे अनुक्रमे 1 कोटी 3 लाख 76 हजार 124 रुपये आणि 9 कोटी 98 लाख 96 हजार 992 रुपये असे एकूण 11 कोटी 2 लाख 73 हजार 116 रुपये अदा करण्याच्या तसेच सिग्नल आणि टेलिकॉमसाठी अनुक्रमे 44 लाख 7 हजार 390 रुपये 84 पैसे आणि 32 लाख 58 हजार 744 रुपये आणि 96 पैसे असे एकूण 76 लाख 66 हजार 135 रुपये इतके शुल्क अदा करण्याच्या सूचना देण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे. दरम्यान, मध्य रेल्वेच्या शुल्काची रक्कम लवकरात लवकर अदा करण्यात यावी जेणेकरून पैशांअभावी कामात अडथळा निर्माण होऊ नये अशी मागणी गलगली यांनी महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

























































