
सर्व पॉर्न साइट्स तसेच इंटरनेटवरील इतर अश्लील मजकुरावर बंदी घाला, अशी मागणी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. महिलांविरोधातील वाढत्या अत्याचाराला पॉर्न साईट्स जबाबदार आहेत, असा दावा त्यांनी केला आहे.
अलीकडच्या काळात देशात सामूहिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. याबाबत नितीश कुमार यांनी चिंता व्यक्त केली आहे. केंद्र सरकारने महिलांच्या सुरक्षेचा विषय गांभीर्याने विचारात घ्यावा आणि तातडीने सर्व पॉर्न साइट्स व इंटरनेटवरील इतर अश्लील मजकुरावर सरसकट बंदी घालावी, अशी विनंती नितीश कुमार यांनी पंतप्रधान मोदी यांना लिहिलेल्या पत्राद्वारे केली आहे. लोक, विशेषतŠ लहान मुले आणि तरुणवर्ग पॉर्न साइट्स पाहतात. इंटरनेटमुळे अश्लील मजकूर अनेकांपर्यंत पोहोचतो. महिलांवरील अत्याचार, सामूहिक अत्याचाराच्या अनेक घटनांना याच पॉर्न साइट्स कारणीभूत असतात, असे नितीश कुमार यांनी म्हटले आहे.
माहिती तंत्रज्ञान कायद्यातील तरतुदी कुचकामी
इंटरनेटवरील आक्षेपार्ह मजकुराला आळा घालण्यासाठी 2000 सालच्या माहिती तंत्रज्ञान कायद्यात काही तरतुदी आहेत. मात्र पॉर्न साइट्स, अश्लील व्हिडीओंवर निर्बंध आणण्यास त्या तरतुदी कुचकामी ठरत आहेत, असे म्हणणे नितीश कुमार यांनी मांडले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांना अनुसरून इंटरनेट सेवा पुरवठादारांना सूचना देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
























































