
पंजाब ऍण्ड महाराष्ट्र सहकारी बँकेचे कर्ज फेडण्यासाठी एचडीआयएलच्या मालमत्तेचा लिलाव करण्यास आमची कोणतीही हरकत नाही, असे बुधवारी एचडीआयएलच्या वतीने व्यवस्थापकीय संचालक आणि आरोपी सारंग वाधवान यांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाला सांगण्यात आले. तसे प्रतिज्ञापत्रच त्यांनी हायकोर्टात सादर केले.
पीएमसी बँकेच्या खातेदारांचे पैसे लवकरात लवकर मिळावे यासाठी एचडीआयएलची मालमत्ता विकावी आणि त्यांची देणी चुकती करावी अशी मागणी करत ऍड. सरोश दमानिया यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली.
पंजाब ऍण्ड महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी सारंग वाधवान आणि कंपनीचे विकासक राकेश वाधवान या दोघांना न्यायालयीन कोठडीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सारंग यांच्या वतीने आज मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले. त्यात असे म्हटले आहे की, बँकेचे कर्ज फेडण्यासाठी जी काही उपलब्ध मालमत्ता आहे ती विकण्यात यावी. त्याला माझी काहीच हरकत नाही. हे प्रतिज्ञापत्र स्वीकारत न्यायालयाने यावरील सुनावणी गुरुवारपर्यंत तहकूब केली.























































