
एसी लोकलमुळे साध्या लोकलच्या फेर्यांना गमवावे लागत असल्याने पश्चिम रेल्वेवर आता सहा डबे वातानुकूलित व सहा डबे साध्या लोकलचे अशा मिक्स लोकलच्या चाचणीला रेल्वेच्या दि रिसर्च डिझाईन ऍण्ड स्टॅण्डर्ड ऑर्गनायझेशनने (आरडीएसओ)मंजुरी दिली. अशा मिक्स एसी लोकलची चाचणी पुढील आठवड्यापासून होणार आहे.
एसी लोकलचे भाडे साध्या लोकलच्या फर्स्ट क्लासपेक्षा 1.3 पट जादा आहे. त्यामुळे महागड्या एसी लोकलकडे प्रवाशांनी पाठ फिरविली होती. पश्चिम रेल्वेवर विरार ते चर्चगेट असा एसी लोकलचा प्रारंभ होताच प्रवाशांनी साध्या लोकलच्या बारा फेर्यांवर गदा आल्याने नाराजी व्यक्त केली होती. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी अर्ध वातानुकूलित लोकल चालवण्याच्या सूचना रेल्वे प्रशासनाला केल्या होत्या. अखेर पश्चिम रेल्वेने सहा डबे वातानुकूलित आणि सहा डबे साधे अशा लोकल चाचणीचा प्रस्ताव तयार केला आहे. त्यामुळे या लोकलच्या चाचणीला येत्या आठवड्यापासून सुरुवात होणार आहे. परंतु त्या आधी तीन डबे वातानुकूलित आणि नऊ डबे साधे अशा चाचणीचा दुसरा प्रस्ताव आहे. तिसरा पर्याय म्हणून नऊ डबे साधे आणि सहा डबे वातानुकूलित असलेल्या पंधरा डबा अर्ध वातानुकूलित लोकलच्या चाचणीचाही प्रस्ताव तयार करून तो आरडीएसओकडे पाठवण्यात आला आहे.



























































