
>> डॉ. विजया वाड
विलास खोले यांचे नवेकोरे पुस्तक पैलतटावर. मराठी साहित्यरत्नांच्या जागवलेल्या आठवणी.
‘।। ऐलतटावर उभे सोबती, पैलतटावर शब्द लाघव
मधे वाहती स्नेहधारा, अन् दोघातील अवघे मार्दव ।।’
विलास खोले आपल्या कसदार लेखणीतून एखादे शब्दचित्र जेव्हा रेखाटतात तेव्हा वाचकांना त्याची भुरळ पडते. असेच आहे. विलास खोले यांचे नवे कोरे पुस्तक पैलतटावर.
हे जग सोडून पैलतटावर गेलेल्या म. वि. गोखले, म. द. हातकणंगलेकर, शंकर वैद्य, द. भि. कुलकर्णी, अनुराधा पोतदार, दिगंबर पाध्ये, रा. ग. जाधव, गो. मा. पवार, ल. रा. नसिराबादकर, जे. व्ही. नाईक अशा सुहृदांच्या आठवणींनी हे पुस्तक वाचनीय झाले आहे. विलास खोले यांनी जागवलेल्या या साऱया आठवणी वेळोवेळी ‘ललित’ या मॅजिस्टिक प्रकाशनाच्या मासिकातून प्रकाशित झाल्या आहेत. हे सारे लेख एकत्रित करून त्याचे पुस्तक करावे असे लेखकास वाटावे नि प्रकाशकानेही ते स्नेहभावे मान्य करावे हा एक आनंद योग आहे. हे जे स्नेही, सुहृद आता या जगात उरले नाहीत त्यांच्याशी सदर लेखकाचे घट्ट ऋणानुबंध होते. मनात आत्मीयता, प्रेम आणि आदर होता. हे सारे होते म्हणून लेख उत्कट झाले आहेत. जी माणसे फार फार आपली असतात ती अजर, अमर असावी असे लेखकासच नव्हे आपणा सर्वांसच वाटते ही गोष्ट त्रिवार सत्य आहे. त्यामुळेच काही लेख त्या त्या व्यक्तीच्या पैलथडी जाण्यानंतर अत्यंत व्यथित मनाने लिहिले गेले आहेत, कारण त्या आठवणी लेखकाला अस्वस्थ करतात.
या पुस्तकाचे मोल एवढय़ासाठी मोठे आहे की, पैलतटावर पोचलेल्या या सारस्वतांनी जवळजवळ अर्धशतकात जी साहित्यिक आणि सांस्कृतिक कामगिरी केली त्याचा आढावा, मागोवा हे पुस्तक घेते. म. वि. गोखले यांची भेट 1961 ची. कायम सुटाबुटात असलेला वाडिया कॉलेजचा केवळ 32 वर्षांचा प्राध्यापक तरुण विद्यार्थ्यांच्या मनावर गारुड न करील तरच नवल! मराठी या विषयाखेरीज ते एनसीसी या विषयाशी संबंधित असल्याने सरांचा इतर विद्यार्थ्यांशी संबंध येई. त्या काळात मराठी वाङ्मय मंडळाला विशेष महत्त्व होते. त्यात सरांचा सक्रिय सहभाग असे. ‘आधुनिक मराठ कवितेचे अंतःप्रवाह’ हा त्यांचा ग्रंथ खोले सर कॉलेजात शिकत असताना प्रकाशित झाला होता. या ग्रंथ प्रकाशनाने गोखले सर यांचे अंगी नवा उत्साह आला होता. त्यांचे अनौपचारिक पण व्यासंगी बोलणे विद्यार्थ्यांवर गारुड करीत असे. ते सुरेख नकला करीत हे वाचून आपल्याला गोखले यांच्या या अज्ञात कोपऱयाची ओळख होते. अतिशय हौशी, खाण्यापिण्यातील विविधतेची आवड असलेले म. वि., विद्यार्थी वर्गाचे लाडके प्राध्यापक होते. गोखल्यांनी आपल्या पत्नीचे नाव बदलून ते ‘सुसंगती’ असे ठेवले होते ही अज्ञात माहितीही खोले सर देतात. महाराष्ट्र साहित्य परिषदेशी त्यांचा निकट संबंध होता. त्यांना साहित्याच्या सेवेने मिळालेला मानसन्मान, परदेश प्रवास, कोठलेही काम अतिशय चोखपणे करण्याची त्यांची वृत्ती यावरही विलास खोले प्रकाश टाकतात. आपणास ज्ञात-अज्ञात अशा कितीतरी आठवणी वाचताना मनातील म. वि. गोखले यांचे चित्र पूर्ण झाल्याचे समाधान वाचकास मिळते, एवढे मात्र निश्चित. निकट संबंध आल्याशिवाय अशी व्यक्तिचित्रे रेखाटता येत नाहीत.
प्रो. जे. व्ही. नाईक 22 जुलै 2019 म्हणजे अगदी आत्ता आत्ता पैलतटावर गेले. सर विलास खोले यांच्यापेक्षा एक तपाने मोठे पण उरातली माया दुथडी भरून वाहत होती. स्वभाव दोघांचेही भिन्न! पण स्नेह, मैत्री नि आपुलकी शेवटपर्यंत खंडित झाली नाही, हे विशेष. खोले सर इस्माईल युसुफमध्ये 1969 या वर्षात मराठी शिकवू लागले तेथेच जे. व्ही. इतिहास या विषयाचे विभाग प्रमुख होते. एनसीसी या विषयाशी संबंधित असल्याने वागण्या, बोलण्यात, चालण्यात एक रुबाब होता. मराठी कादंबरीच्या इतिहासावर ‘भाऊ महाजन आणि पहिली मराठी कादंबरी’ हे महत्त्वाचे पुस्तक लिहिले. इतिहासाचा अभ्यास हाच त्यांचा श्वास आणि ध्यास होता, असे आग्रहपूर्वक प्रतिपादन करतात. विलास खोले त्यांच्या समग्र लेखनाचा पहिला खंड हा नाईकांच्या व्यक्तिमत्त्वाचा आरसा म्हणता येईल आणि तो अगदी लखलखीत आहे, असेही खोले म्हणतात. म. द. हातकणंगलेकर हे सुहृद सरांचे! त्यांच्याबद्दल माझ्या मनात एक भीतीयुक्त आदर होता. पण त्यांच्या स्वभावातील ऋजुता, हळवेपणा आणि प्रेम त्यांच्या निकट गेलेल्या खोले सरांनी अनुभवला आणि तो वाचकांना ‘पैलतटावर’ या पुस्तकाद्वारे दिला हे वाचकांचे भाग्य…. त्यांचे आत्मचरित्र त्यांनी खूप मोठे लिहिले होते, पण ते संपादित स्वरूपात प्रकाशित झाले. कुठल्याही समारंभाचा उत्तम समारोप करण्याची त्यांची हातोटी होती. अशा काही न ठाऊक असलेल्या गोष्टी हातकणंगलेकर यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकतात.
द. भि. कुलकर्णी हे मराठी सारस्वताचे लाडके अपत्य. लोकप्रियता अमाप लाभलेला साहित्यिक मौजेने प्रदीर्घ काळ द. भिंचा महाकाव्यावरील ग्रंथराज आपल्यात ठेवून घेतला होता. पण अखेर नागपूरच्या विजय प्रकाशनाने तो प्रकाशित केला. फार मोठय़ा व्यक्तीच्या आयुष्यातील ही अज्ञात गोष्ट वाचून आश्चर्य वाटते आणि प्रख्यात लेखकासही प्रतीक्षा करावी लागते हे वाचून नवीन लेखकांची अधिरता थोडी शमेल. अनुराधा पोतदार… माणसात असूनही आयुष्यात प्रदीर्घ काळ एकाकीपणा सोसलेली ‘अक्षरयात्री’. तिचे एकाकीपण मनाला गलबलून टाकते आणि या एककीपणातही इतकी रसरशीत पाने त्यांनी वाङ्मयवृक्षास बहाल केली या घटनेने जीव सुखावतो. असे अनुराधा पोतदार यांच्या लिखाणाचे वर्णन करता येईल. भावपूर्ण लालित्याने संपन्न, अनुप्रासयुक्त आणि हृदयाला साद घालणारे अमोघ वक्तृत्व लाभलेल्या, ऊन-पाऊस सारख्याच ममत्वाने अंगावर झेलत त्यांची प्रतिबिंबे साहित्यात उमटविण्यात यशस्वी झालेल्या! उत्तम लेख असेच या लेखाचे वर्णन करता येईल. व्यक्ती तितक्या प्रकृती! सर्जनशील लेखकही शेवटी माणसेच! त्यांच्या मनाने ‘मानवी’ आरसे लेखकाने लख्ख पुसून आपणास दाखविले आहेत हा वाचनोत्तर आनंद!
पैलतटावर
लेखक – विलास खोले
प्रकाशक – मॅजेस्टिक प्रकाशन
पृष्ठ – 201, मूल्य – 250 रु.
मुखपृष्ठ – सतिश भावसार






























































