
संसदेत नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत गैरसमज आहेत. देशभरात याविरोधात मोर्चे, आंदोलने सुरू असून हिंसाचारही सुरू झाला आहे. अशा परिस्थितीत नागरिकांचे गैरसमज दूर करण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्र सरकार कोणत्याही समाजाच्या, धर्माच्या नागरिकांच्या हक्कांवर गदा येऊ देणार नाही. भीती बाळगू नका, सर्वांचे संरक्षण करणार. लोकशाहीच्या मार्गाने आंदोलने करा, मोर्चे काढा, मुख्यमंत्री म्हणून मला येऊन भेटा, पण राज्याच्या शांततेला गालबोट लागेल असे वर्तन करू नका, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी केले.
नागरिकत्व सुधारणा कायदा मंजूर झाल्यानंतर देशभरात निर्माण झालेल्या अस्वस्थतेच्या पार्श्वभूमीवर राज्यातही निदर्शने होत आहेत. राज्यातील कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत निवेदन केले. उद्धव ठाकरे म्हणाले, महाराष्ट्र शांत राहावा, कायदा-सुव्यवस्था राहावी यासाठी गेले दोन-तीन दिवस मी अनेकांशी बोलतो आहे. पण हे सर्वांनी मिळून करण्याची आवश्यकता आहे. म्हणून मी सर्वांना एकच सांगतोय हा जो कायदा संसदेने केला आहे तो घटनेला धरून आहे की नाही याची चर्चा कोर्टात व्हायची आहे. कोर्टाचे मार्गदर्शन बाकी आहे. काही जणांच्या मनात भीती आहे की हा कायदा अमलात आल्यानंतर आपल्याला या देशातून हाकलून दिले जाईल. सर्व जातीपातीच्या, धर्माच्या, समाजाच्या बंधूंना मी सांगू इच्छितो की, महाराष्ट्र सरकार हे कोणत्याही समाजाच्या, धर्माच्या नागरिकांच्या हक्काला धक्का लागू देणार नाही हे वचन मी देत आहे. त्यांचे जे हक्क आहेत ते या राज्यात अबाधित राहतील. कृपा करून गैरसमजाने या राज्याच्या शांततेला गालबोट लागेल, हिंसाचार उसळेल असे वर्तन कोणी करू नये. लोकशाहीच्या मार्गाने आपल्याला काही निवेदने द्यायची असतील तर जरूर द्या. मुख्यमंत्री म्हणून मला भेटायला यायचे असेल तर जरूर या. मोर्चे काढायचे असतील तर जरूर काढा, परंतु आपल्या राज्याची जी एक शान आहे तिला धक्का लागेल असे वर्तन करू नका हे आवाहन मी महाराष्ट्राच्या जनतेला करीत आहे.
एकत्र मिळून गैरसमज दूर करण्याची गरज
विरोधी पक्षालाही आवाहन करतो की, आपण सर्व मिळून जनतेच्या मनातला गैरसमज दूर करण्याची आवश्यकता आहे. आपल्या सर्वांच्या माध्यमातून आपापल्या मतदारसंघात हे आवाहन करावे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.




























































