
महिंद्रा ऍण्ड महिंद्रा कंपनीच्या संचालक मंडळात मोठी उलथापालथ होणार आहे. कंपनीतील सर्वात उच्च म्हणजे कार्यकारी अध्यक्षपदावरील आनंद महिंद्रा येत्या एप्रिलमध्ये आपले पद सोडणार आहेत. त्यानंतर ते समूहाचे नॉन एक्झिक्युटिव्ह चेअरमन बनतील. व्यवस्थापकीय संचालक पवन गोयंका हे येत्या नोव्हेंबरपर्यंत कंपनीच्या कार्यकारी अध्यक्षपदाचा अतिरिक्त भार सांभाळणार आहेत.
कंपनीने याबाबत स्टॉक एक्सचेंजला माहिती देताना सांगितले की, आनंद महिंद्रा यांनी 1 एप्रिलपासून पद सोडल्यानंतर ते कंपनीचे सल्लागार म्हणून काम पाहतील. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक पवन गोयंका 11 नोव्हेंबरपर्यंत कार्यकारी अध्यक्षपदाचा अतिरिक्त भार सांभाळतील. आनंद महिंद्रा यांना ऑगस्ट 2012मध्ये अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक बनवण्यात आले होते. त्यानंतर नोव्हेंबर 2016 मध्ये ते कार्यकारी अध्यक्ष बनले.
























































