
ऑलिम्पिक या जागतिक स्तरावरील मानाच्या क्रीडा महोत्सवात हिंदुस्थानला अद्याप मोठी मजल मारता आलेली नाही. 2024 व 2028 सालामध्ये होणाऱया ऑलिम्पिकमध्ये पदकांची लयलूट करता यावी यासाठी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून योजना आखण्यात आली आहे. त्यानुसार 14 खेळांना प्राधान्य देण्यात आले आहे.
केंद्राने आता 2024 सालात होणाऱया ऑलिम्पिकसाठी मोर्चेबांधणी केलीय. यासाठी तिरंदाजी, बॉक्सिंग, नेमबाजी, बॅडमिंटन, कुस्ती, हॉकी, वेटलिफ्टिंग, सायकलिंग, ऍथलेटिक्स या खेळांवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. त्यानंतर 2028 सालातील ऑलिम्पिकसाठी या नऊ खेळांसह टेबल टेनिस, ज्युडो, जलतरण, तलवारबाजी व रोइंग या पाच खेळांमधून पदके मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत



























































