साखरपुडा झालेल्या तरुणाचा लग्नापूर्वी अपघाती मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सिन्नरहून कोल्हारकडे घरी जात असताना मोटारसायकल व ट्रकच्या धडकेत कोल्हार येथील सूरज आत्माराम चौधरी (26) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना संगमनेर जवळील सायखिंडी गावाजवळ घडली.

शनिवारी सिन्नर येथील मायलॉन कंपनीमधून आपली ड्युटी संपवून सूरज चौधरी आपली मोटारसायकल (एम एच 17 बी सी 7496) वरून कोल्हार येथील आपल्या घरी निघाला होता. सायंकाळी सायखिंडी गावाजवळ हायवा कंपनीचा डंपरने (एम एच 17 बी वाय 5999) मोटारसायकलला मागील बाजूने जोरदार धडक दिली. अपघातात सूरज चौधरी यास डोक्यास मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

सूरज चौधरी याचा नुकताच साखरपुडा झालेला होता. मात्र लग्नापूर्वीच त्याच्यावर काळाने घाला घातल्याने हळहळ व्यक्त होत आहे. मयत सूरज यांच्या वडिलांचे मागील वर्षीच निधन झाले होते. त्यानंतर आता सूरज याचे अपघाती निधन झाल्याने चौधरी कुटुंबावर शोककळा पसरली आहे. घटनेनंतर ट्रक चालकास संगमनेर पोलिसांनी गाडीसह ताब्यात घेतले आहे. याबाबत संगमनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.