
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था शिर्डीच्या वतीने नाताळ सुट्टी व नवीन वर्षाचे स्वागतानिमित्त शिर्डी महोत्सवाचे आयोजन केले आहे. श्री साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेत समाधी मंदिर मंगळवारी (31 डिसेंबर) दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवण्यात येणार असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली.
दरवर्षी नाताळ सुट्टी व नवीन वर्षाचे स्वागतानिमित्त श्रींच्या दर्शनासाठी शिर्डीत मोठ्या प्रमाणात भाविक येतात. येणाऱ्या सर्व भाविकांना श्रींच्या समाधीच्या दर्शनाचा लाभ मिळावा व होणाऱ्या गर्दीचे नियोजन योग्य रितीने व्हावे, या उद्देशाने मंगळवारी श्रींचे समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे 31 डिसेंबरची शेजारती व 1 जानेवारीची पहाटेची काकड आरती होणार नाही. नाताळ व नवर्षाच्या सुट्टीच्या गर्दीमुळे बुधवार (25 डिसेंबर), मंगळवार (31 डिसेंबर) व बुधवार (1 जानेवारी) असे तीन दिवस श्री साईसत्यव्रत पूजा, अभिषेक पूजा बंद राहील. याबरोबरच मंगळवार 31 डिसेंबर व 1 जानेवारी असे दोन दिवस वाहन पूजा बंद राहील. मंदिर व परिसरात फटाके व वाद्य वाजविण्यास मनाई करण्यात आली असून सुरक्षिततेच्या दृष्टीने शिस्तीचे पालन करण्याचे आवाहनही मुगळीकर यांनी केले.































































