सर्व पॅसेंजर गाड्या ताशी, 80 किलोमीटर वेगाने धावणार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानातील सर्व पॅसेंजर गाडय़ांचा वेग ताशी 80 किमी करण्याचे उद्दीष्टय़ रेल्वे मंत्रालयाने ठेवले आहे. त्यानुसार पॅसेंजर गाडय़ांच्या वेगात 30 टक्के तर मालगाडय़ांचा वेगात 80 टक्के वाढ केली जाणार आहे. येत्या साडेचार वर्षात हे लक्ष्य गाठले जाणार आहे.

रेल्वे मंत्रालयाने शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रालयासमोर एक प्रेझेंटेशन दिले. त्यावेळी पुढील पाच वर्षांतील योजनांची माहिती देण्यात आली. या प्रेझेंटेशनमध्ये रेल्वेने सांगितले की, मालगाडय़ांचा वेग 2024 पर्यंत ताशी 45 किमी केला जाईल. टप्प्याटप्प्याने हा वेग वाढवण्यात येईल. 2020-21 मध्ये ताशी 30 किमी वेग गाठला जाईल. त्यानंतर 2020-23 मध्ये तो वाढवून 39 किमी केला जाईल आणि 2024 मध्ये हा वेग 45 किमीपर्यंत नेण्याची योजना आहे. सध्या मालगाडय़ांचा सरासरी वेग 25 किमी आहे. नव्या योजनेनुसार 12 तासांत दिल्ली ते मुंबईचा प्रवास प्रस्तावित आहे.

तिरुअनंतपुरम ते कासरागोड – रेल्वे कॉरिडॉर

प्रवाशांचा वेळ वाचावा म्हणून तिरुअनंतपुरम ते कासरागोड दरम्यानच्या सेमी हायस्पीड रेल कॉरिडोर प्रोजक्टला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. कॉरिडोरची लांबी 540 किमी असेल. त्यासाठी सुमारे 66 हजार कोटी रुपये खर्च येईल. या कॉरिडोरला सिल्व्हर लाईन असे नाव दिले आहे. या ट्रकवर ताशी 200 किमी वेगाने ट्रेन धावू शकतील. 2024 पर्यंत कॉरिडोरचे काम पूर्ण केले जाणार आहे. कॉरिडोरमुळे तिरुअनंतपुरम आणि कासरागोड यांच्यातील प्रवासाला 12 तासांऐवजी चार तास लागतील.