झारखंडही गेले! चौखूर उधळलेल्या भाजपच्या अहंकाराला मतदारांचा लगाम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चौखूर उधळलेल्या अहंकाराला मतदारांनी चांगलाच लगाम घातला आणि महाराष्ट्रापाठोपाठ झारखंडही भाजपच्या हातून गेले. झारखंडच्या जनतेने भाजपची गठडी वळली आणि राज्याची सत्ता काँग्रेस-झामुमो-राजदच्या आघाडीकडे सोपवली. काँग्रेस-झारखंड मुक्ती मोर्चा (झामुमो) आघाडीने 47 जागांवर, तर सत्ताधारी भाजपने 26 जागांवर विजय मिळवला. इतर 9 जागांपैकी झारखंड विकास मोर्चाला 3, ऑल झारखंड स्टुडंट्स युनियनला (एजेएसयू) 2 आणि इतरांना 4 जागा मिळाल्या. मतदारांनी मुख्यमंत्री रघुवरदास यांच्यासह सहा मंत्र्यांनाही पराभवाची धूळ चारली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा या दोघांनीही हा पराभव स्वीकारला आहे. झामुमोचे नेते हेमंत सोरेन हे झारखंडचे नवे मुख्यमंत्री होतील हे आता स्पष्ट आहे.

झारखंडच्या 81 मतदारसंघांत 30 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर या कालावधीत पाच टप्प्यांत मतदान घेण्यात आले होते. आज सकाळी आठ वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला. दोन तासांतच मतदारांनी दिलेला कौल स्पष्ट झाला. आघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार हेमंत सोरेन हे दुमका व बरहेट या दोनही मतदारसंघांतून मोठय़ा फरकाने विजयी झाले. भाजपच्या अहंकाराला मतदारांनी वेसण घालत त्यांची घोडदौड 26 जागांवरच रोखली. मागच्या निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले होते. यावेळेस त्यांच्या जागा दुपटीने कमी झाल्या. विद्यमान मुख्यमंत्री रघुवरदास हे जमशेदपूरमधून पराभूत झाले. भाजपचे बंडखोर सरयू राय यांनी त्यांना पराभूत केले. चोवीस वर्षांपासून रघुवरदास या मतदारसंघातून निवडून येत आहेत.

दिग्गज मंत्री पराभूत

रघुवरदास यांच्या मंत्रिमंडळातील समाजकल्याण मंत्री डॉ. लुईस मरांडी, नगरविकास मंत्री सी. पी. सिंह, कामगार मंत्री राज पालीवार, जलसंपत्ती मंत्री रामचंद्र सहिस, शिक्षण मंत्री डॉ. नीरा यादव यांना मतदारांनी घरचा रस्ता दाखवला.

मोदी-शहांचा करिश्मा ओसरला

पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा करिश्मा झारखंडमध्ये ओसरला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडमध्ये नऊ जाहीर सभा घेतल्या. त्यांनी एकूण 27 मतदारसंघांत प्रचाराचे रान उठवले होते, मात्र या 27 पैकी 17 मतदारसंघांत भाजपला पराभवाचे तोंड बघावे लागले. अमित शहा यांनीही मोदींएवढय़ाच सभा घेतल्या, पण त्यांनाही मतदारांनी झिडकारल्याचे दिसून आले.

राहुल, प्रियंकाच्या मोजक्याच सभा

काँग्रेसचे नेते राहुल गांधी व प्रियंका वढेरा यांनी झारखंडमध्ये मोजक्याच सभा घेतल्या. राहुल गांधी यांनी पाच, तर प्रियंका यांनी केवळ एकच सभा घेतली. स्थानिक नेत्यांच्या जोरावरच काँग्रेसने विजय मिळवला.

भाजपने परिस्थिती समजून घेतली असती तर आज चित्र वेगळे दिसले असते. अतिआत्मविश्वासामुळेच त्यांच्यावर ही वेळ आली. – सरयू राय, भाजप बंडखोर

भाजपला उतरती कळा

लोकसभा निवडणुकीतील झंझावाती यशामुळे हुरळून गेलेल्या भाजपच्या हातातून गेल्या दोन वर्षांत सात राज्ये अलगद निसटून गेली आहेत. 2017 मध्ये भाजपच्या अधिपत्याखाली देशातील 19 राज्ये होती. 72 टक्के लोकसंख्या आणि 75 टक्के भूभागावर भाजपचे अधिराज्य होते. झारखंडच्या पराभवानंतर आता भाजपचा पसारा 42 टक्क्यांवरच आला आहे. मध्य प्रदेश, राजस्थान तसेच छत्तीसगडमध्ये भाजपची सत्ता होती. एक वर्षापूर्वी काँग्रेसने ही राज्ये भाजपच्या हातून हिसकावून घेतली. 2018 पूर्वी आंध्र प्रदेशात भाजप-तेलगू देसमचे सरकार होते, मात्र राज्याला विशेष दर्जा देण्यावरून देसमने भाजपची साथ सोडली. 2019 मध्ये मतदारांनी वायएसआर काँग्रेसला बहुमत दिले. नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रही भाजपच्या हातून गेला. जम्मू-कश्मीरमध्ये पीडीपीसोबत भाजपने सरकार बनवले होते. 2018 मध्ये भाजपने पीडीपीसोबतचे नाते तोडले. त्यामुळे तेथे राष्ट्रपती राजवट लागली.

  • ज्या 27 मतदारसंघांत पंतप्रधान मोदी यांनी सभा घेतल्या त्यापैकी 17 जागांवर भाजपचे उमेदवार पिछाडीवर गेले. पराभवाबरोबरच भाजपच्या जागाही दुपटीने घसरल्या आहेत. गेल्या दोन वर्षांत भाजपच्या पदरी पडलेला हा सातवा पराभव आहे.
  • निकालाचा कौल स्पष्ट होताच झामुमोचे नेते आणि झारखंडचे भावी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी वडील शिबू सोरेन यांचे आशीर्वाद घेतले.

भावी मुख्यमंत्र्यांची सायकलवरून रपेट

निवडणूक निकालाचे चित्र स्पष्ट होत असतानाच झामुमोचे नेते आणि भावी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी चक्क सायकलवरून रपेट मारली. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, नोटाबंदी असो वा एनआरसी, नागरिकत्व कायदा असो, लोकांना रांगेत उभे करण्याच्या सवयीने भाजपला सत्तेतून बाहेर फेकले आहे.

झारखंड विधानसभा – एकूण जागा 81

विजयी – आघाडीवर

  • भाजप 25 – 01
  • काँग्रेस 16 – 00
  • जेएमएम 30 – 00
  • राजद 01 – 00
  • झाविमो 03 – 00
  • आजसू 02 – 00
  • इतर 02 – 01