देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदी यांनाच तोंडघशी पाडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘देशात कोठेही ‘डिटेंशन सेंटर’ अस्तित्वात नाही,’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामलीला मैदानावर जाहीरपणे सांगितले. मात्र अवघ्या 24 तासांतच माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदी यांना तोंडघशी पाडले. ‘डिटेंशन सेंटर’ सुरू करण्यासंदर्भात केंद्रीय गृह मंत्रालयाने पत्रव्यवहार केला होता. त्यानुसार आपण गृह मंत्री असताना त्यासाठी सिडकोकडे जमीन मागणीसाठी पत्रव्यवहार केला असल्याचे फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

मुंबईसारख्या ठिकाणी डिटेंशन सेंटर सुरू करण्यासंदर्भात केंद्रीय गृह मंत्रालयात निर्णय घेण्यात आला. त्यांच्या सूचनेनुसार आपण राज्याचा गृह मंत्री म्हणून त्याच्या जागेसाठी सिडकोकडे पाठपुरावा केला होता, अशी कबुली फडणवीस यांनी दिली.

अमृता फडणवीस हे वेगळे व्यक्तिमत्त्व

अमृता फडणवीस या महाविकास आघाडी सरकारवर करीत असलेल्या टीकेसंदर्भात विचारले असता फडणवीस म्हणाले, अमृता फडणवीस हे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे. त्यांचा निर्णय त्या स्वतः घेतात. व्यक्ती म्हणून त्या कोणत्याही विषयावर मत मांडू शकतात. त्या माझ्या अंतर्गत काम करीत नाहीत. तसेच त्या कधीही राजकारणात येण्याची शक्यता नाही, असे फडणवीस म्हणाले.