
एसटीच्या प्रवासात विसरून गेलेल्या वस्तू परत मिळणे कठीणच असते. मात्र, एसटीच्या प्रवासात विसरलेली पर्स त्यातील पाच तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र व पैसे आणि अन्य साहित्या गोरक्ष खोकराळे कुटुंबाला परत मिळाली आहे. त्यामुळे या कुटुंबाने एसटीच्या प्रामाणिक चालक-वाहकांचा सन्मान केला.
डोंबिवलीला राहात असलेले सुरेखा व गोरक्ष खोकराळे दाम्पत्य काही कामानिमित्त पुणे जिल्ह्यातील कारेगाव (ता. आंबेगाव) येथे आले होते. तेथून डोंबिवलीला जाण्यासाठी आळेफाटा येथून नगर-कल्याण गाडीतून ते कल्याणला गेले. तेथे बसमधून उतरताना त्यांची पर्स बसमध्येच राहिली. पुढे डोंबिवलीच्या लोकल प्रवासाच्यावेळी त्यांना पर्स सोबत नसल्याचे लक्षात आले. त्यात दागिने व अन्य साहित्य होते. त्यांनी पुन्हा कल्याण बसस्थानकात येऊन चौकशी केली. संबंधित नगर-कल्याण गाडी पुन्हा नगरला गेल्याचे त्यांना समजले. या गाडीचे वाहक के. एस. सांगळे व चालक एम. यु. वारे यांनी गाडीत पर्स सापडल्यावर ती ताब्यात घेऊन गाडी नगरला परत आल्यावर येथील तारकपूर आगारात जमा केली.
खोकराळे दाम्पत्याने कल्याण बसस्थानकात चौकशी केल्यावर गाडी नगरला गेल्याचे समजले होते. त्यांनी तारकपूर बसस्थानकाशी संपर्क साधला. त्यावेळी संबंधित पर्स सुरक्षित असल्याचे त्यांना कळल्यावर खोकराळेंचे नगरमधील बंधू मच्छिंद्र खोकराळे व विजया खोकराळे यांनी तारकपूर बसस्थानकात जाऊन ती ताब्यात घेतली. यावेळी खोकराळे यांनी वाहक सांगळे व चालक वारे यांचा सन्मान केला. यावेळी सहायक वाहतूक अधीक्षक विठ्ठल केंगारकर व अन्य उपस्थित होते.





























































