
मुंबईत अनेक ठिकाणी सुरू असलेले मेट्रो मार्गांचे काम, वाढलेली खासगी वाहने यामुळे मोठय़ा प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. त्यामुळे बेस्टच्या अनेक गाडय़ा या कोंडीत अडकून पडतात. त्याचा फटका बेस्ट उपक्रमाला बसला असून त्यामुळे बेस्टचा तोटा वाढला आहे, अशी कबुली खुद्द बेस्ट प्रशासनाने दिली.
बेस्ट भवनात आज झालेल्या बैठकीत बेस्ट परिवहन उपक्रमाच्या वाढत्या तोटय़ाबाबत सुनील गणाचार्य यांनी हरकतीचा मुद्दा मांडला. ‘मुंबईतील अनेक विकासकामांमुळे शहरातील वाहतूककोंडी वाढली आहे. यात मेट्रो मार्गांचे काम सुरू आहे. बेस्टच्या दररोज 3 हजार 333 बस धावतात. मात्र त्या नियोजित वेळेत पोहोचू शकत नाहीत. या सगळ्याचा फटका बेस्टला बसत आहे. दांडी मारणारे कर्मचारी आणि 1000 ते 1200 कर्मचाऱयांची कमतरता याचाही परिणाम कामावर होत आहे. त्यामुळे तोटा वाढत आहे. काही बेस्ट आगारांनी नियोजित वेळेत बस चालवून तोटा कमी करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. मात्र खर्च वाढत आहे.’ गणाचार्य यांच्या हरकतीच्या मुद्दय़ाला उपस्थित सदस्यांनी पाठिंबा दिला.
दरम्यान, कोणत्या बेस्ट डेपोंची बस किती किलोमीटर धावली, याचा अहवाल (लॉस ऑफ किलोमीटर) दर एक ते तीन महिन्यांनी सभागृहाला सादर करावा, असे आदेश बेस्ट समिती अध्यक्ष अनिल पाटणकर यांनी दिले. त्यामुळे प्रत्येक डेपोचे उत्पन्न आणि होणारा तोटा किती कमी झाला हे कळेल, असे पाटणकर म्हणाले. यावेळी वांद्रे, कुलाबा आणि काळा किल्ला आगाराने तोटा कमी केला तर दिंडोशी आगाराचा तोटा वाढल्याचे प्रशासनाने सांगितले.
दांडीबहाद्दरांची चौकशी व्हावी!
दांडीबहाद्दरांची संख्या मोठी आहे. त्यांना इतकी सुट्टी कशी मिळते, सुट्टी देणाऱया प्रशासकीय विभागाशी त्यांचे लागेबांधे आहेत का, गैरहजर राहण्याची कारणे काय आहेत, कर्मचाऱयांच्या वेल्फेअर ऍक्टिव्हिटी कमी झाल्याचा हा परिणाम आहे का, याची बेस्ट प्रशासनाने चौकशी करावी आणि त्याची माहिती सभागृहाला द्यावी, अशी मागणी सुनील गणाचार्य यांनी केली.
लोकसंख्या वाढल्याने वाहनांची संख्या वाढली आहे. त्यामुळे वाहतूककोंडी होत आहे. त्याचबरोबर शहरातील अनेक भागात मेट्रोची कामे सुरू आहेत. वाढत्या लोकसंख्येला आणि प्रवाशांना खासगी सेवा देणाऱयांचीही संख्या वाढली आहे. त्याचा परिणाम बेस्टच्या उत्त्पन्नवार झाला आहे.
– सुरेंद्र बागडे, महाव्यवस्थापक, बेस्ट
























































