राज्यसभेत भाजपला झारखंडचा झटका बसणार, बहुमताचे स्वप्न भंगणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
parliament

राज्यसभेत बहुमताचे स्वप्न पाहणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारला झारखंडच्या पराभवाने मोठा झटका दिला आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत केवळ 25 उमेदवार निवडून आल्यामुळे एनडीएला 2024 पर्यंत राज्यसभेच्या हातातील तिन्ही जागा गमवाव्या लागण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे पुढच्या लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना एनडीएकडे झारखंडमध्ये राज्यसभेची एकही जागा शिल्लक नसणार आहे.

मित्रपक्षांशी पंगा घेऊन स्वबळावर निवडणूक रिंगणात उतरलेल्या भाजपला झारखंडमध्ये मतदारांनी जोरदार दणका दिला. विधानसभेवर झारखंड मुक्ती मोर्चाचा झेंडा फडकला. विधानसभेच्या 81 जागांपैकी अवघ्या 25 जागांवर कसाबसा विजय मिळवलेल्या भाजपला या पराभवासह राज्यसभेत हादरा बसणार आहे. संसदेच्या या वरिष्ठ सभागृहात सध्या एनडीए सरकारचे बहुमत नाही. 2024 पर्यंत या बहुमताचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार एनडीएने केला असताना झारखंडमधील भाजपच्या तीन जागा संकटात सापडल्या आहेत. राज्यसभेच्या आगामी निवडणुकांत भाजप आणि झारखंड मुक्ती मोर्चा-काँग्रेस-आरजेडी युती यांच्यात लढत होणार आहे.

झारखंडमध्ये सध्या राज्यसभेच्या सहा जागांपैकी तीन जागा भाजपकडे आहेत, तर काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाकडे प्रत्येकी एक जागा आहे.

2020, 2022 आणि 2024 अशा दोन-दोन वर्षांच्या फरकाने राज्यात राज्यसभेच्या दोन-दोन जागांसाठी निवडणूक होणार आहे.

जेव्हीएमची साथ मिळाली तरच भाजप तरणार

झारखंडच्या पराभवाने पायाखालची वाळू सरकलेल्या भाजपचे भवितव्य आता झारखंड विकास मोर्चाच्या (जेव्हीएम) हाती आहे. जेव्हीएमची मनधरणी करण्यास यश आले तरच भाजपला 28 आमदारांचा जादुई आकडा गाठता येईल व त्यामुळे राज्यसभेच्या तीन जागा शाबूत राहतील. जेव्हीएमचे तीन सदस्य आहेत.

झारखंडने महाराष्ट्राकडून प्रेरणा घेतली – सोरेन

शरद पवार यांच्या लढाऊ बाण्याने आम्हाला जिंकण्याची प्रेरणा दिली, अशी प्रतिक्रिया झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांनी मंगळवारी दिली. सोरेन यांच्यावर संपूर्ण देशभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही त्यांचे कौतुक केले. त्यावर सोरेन यांनी ट्विटरच्या माध्यमातून पवार यांचे आभार मानले. शरद पवार यांनी महाराष्ट्रात केलेल्या संघर्षामुळे आम्हाला भाजपविरोधात लढण्याची प्रेरणा मिळाली, असे त्यांनी म्हटले.