
पालिकेच्या माध्यमातून चांदिवलीत लवकरच 250 खाटांचे अद्ययावत रुग्णालय होणार आहे. एक लाख स्क्वेअर फूट जागेवर हे प्रशस्त रुग्णालय होईल. शिवसेना आमदार आणि नगरसेवक दिलीप (मामा) लांडे यांच्या पाठपुराव्यामुळे याबाबत तातडीने कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश आज उपायुक्त सुनील धामणे यांनी संबंधित अधिकाऱयांना दिले.
चांदिवली विधानसभा क्षेत्रातील गोरगरीब रुग्णांना मोफत रुग्णसेवेसाठी पालिकेच्या रुग्णालयांवर अवलंबून राहावे लागते, त्यामुळे चांदिवलीवासीयांना चांदिवलीतच दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी रुग्णालय सुरू करावे अशी मागणी दिलीप लांडे यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर आज पालिका मुख्यालयात संबंधित अधिकाऱयांची निर्णायक बैठक पार पडली. यावेळी रुग्णालयासाठी आरक्षित असणाऱया भूखंडावर रुग्णालयासाठी सात मजल्यांची इमारत उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.
जंगलेश्वर मंदिर रोडजवळ स्मशानभूमी
चांदिवलीत अंत्यविधीसाठी पार्थिव घाटकोपर किंवा मरोळ येथे न्यावे लागते. ही समस्या सोडवण्यासाठी जंगलेश्वर मंदिर रोडजवळ हिंदू स्मशानभूमी बांधण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. या ठिकाणी आरक्षित असणाऱया 21 हजार स्क्वेअर फूट जागेवर लवकरच संरक्षक भिंत बांधण्यात येणार असून स्मशानभूमी बांधण्याचे कामही लवकरच करण्यात येणार असल्याचे दिलीप लांडे यांनी सांगितले.




























































