
बीडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याच्या अफवेवरून 11 जणांना अटक करण्यात आली आहे. एनआरसी आणि नागरिकत्व संशोधन कायद्याला विरोध म्हणून 20 डिसेंबर रोजी बीडमध्ये आंदोलन झाले होते. त्यानंतर शहरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याची अफवा सोशल मीडियावर पसरली होती. त्याप्रकरणी पोलिसांनी 11 जणांना अटक केली आहे.
20 डिसेंबर रोजी झालेल्या या आंदोलनात तब्बल 2 हजारांहून अधिक लोकांना सहभाग होता. आंदोलनाला हिंसक वळण लागलं आणि जमावाने पोलिसांवर हल्ला करायला सुरुवात केली. काहींनी सार्वजनिक बसेसवर दगडफेकही केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या. या प्रकरणी 100 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच दरम्यान काही जणांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याच्या खोट्या पोस्ट व्हायरल केल्या. प्रकरण गंभीर होण्याआधी पोलिसांनी या पुतळ्याचे फोटो व्हायरल करून आधीची माहिती ही निव्वळ अफवा असल्याचं स्पष्ट केलं.
या प्रकरणी अफवा पसरवून दोन सामाजिक घटकामध्ये तेढ पसरवण्याच्या गुन्ह्याखाली बीड जिल्ह्याच्या गेवराई, पिंपळनेर, माजलगाव शहर, धारूर, सिरसाळा, नेकनूर या भागातून तब्बल 11 जणांना अटक करण्यात आली. संतोष भोसले, सचिन दाभाडे, रवी काळे, अमोल पाटील, सतीश बोटे, बाळासाहेब पाठारकर, दीपक घाटे, सागर शिंदे, सचिन सकते, शरद लोकरे आणि राहुल जोगदंड अशी या आरोपींची नावं आहेत. हे सर्व आरोपी 18 ते 30 वर्षं वयोगटातले आहेत. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

























































