
‘बारोमास’ नाटय़स्पर्धेतील नाटके आता व्यावसायिक रंगभूमीवरही तितक्याच ताकदीने उभी राहू लागली आहेत.
मराठी नाटय़सृष्टीचा हंगाम बदललेला आहे. दिवाळी ते फेब्रुवारी असा आता आपला हंगाम म्हणता येईल. याचं प्रमुख कारण म्हणजे स्पर्धा आणि नाटय़निर्मात्यांनी बिनचूक ओळखलेला या स्पर्धांचा मार्केटिंगसाठी होणारा उपयोग. विविध वाहिन्या आणि वृत्तपत्र आपल्या माध्यमक्षमतेसह या काळात स्पर्धा भरवतात. हा काळ त्यांनी निवडला कारण वर्ष सरताना त्या वर्षभरात दाखल झालेल्या नाटकांची दखल घेता येईल. नाटय़सृष्टीने मात्र त्यांचा हा डाव आपल्याला सोयिस्कर होईल असा फिरवला. आता दिवाळीच्या मुहूर्तापासून ते वर्षाखेरपर्यंत म्हणजेच केवळ तीन महिने नाटक तारायचं त्यात ते जितकं उशिरा आणता येईल तितकं उशिरा आणायचं. या माध्यमिक स्पर्धांमध्ये उतरवायचं. तुक्का लागला तर या माध्यमांमधून त्या नाटकाची फुकट पब्लिसिटी साधता येते आणि नाटक चालू शकतं किंवा नुकसान आवरतं घेता येतं. बिजनेस स्ट्रटेजी म्हणून हे भन्नाट आहे. त्यात यावर्षी राज्य नाटय़स्पर्धादेखील अजून सुरू आहेत. त्यामुळे हौशी मंडळांचीही गर्दी सध्या चालू आहे. अशात प्रेक्षकांना आणि नाटय़रसिकांना परवणी आहे. तीसहून अधिक नाटकं आज रंगभूमीवर सुरू आहेत. अखंड हिंदुस्थानात कोणतीही नाटय़सृष्टी इतकी सशक्त नाही. पण दुर्दैवाने ही संख्येने इतकी मोठी इंडस्ट्री अर्थकारणात किती मोठी असायला हवी याचा अंदाज कुणालाच आलेला दिसत नाही. म्हणूनच तुटपुंज्या अर्थकारणात वावरत राहून नट आणि निर्माते सोडून बाकी सर्व मंडळी अत्यंत हलाकीच्या परिस्थितीत रंगभूमीची सेवां करताना दिसतात हे देशातल्या सर्वात मोठय़ा नाटय़सृष्टीचं विदारक सत्य आपल्याला पहायला मिळतंय. असचं महाराष्ट्राचं दुसरं विदारक चित्र घेऊन एक नाटक या हंगामात उभं राहिलं आहे. आपण आज राज्य नाटय़स्पर्धेत बहुचर्चिलेलं ‘बारोमास’ नाटक इथे पडताळणार आहोत.
राज्य नाटय़स्पर्धेत नाटकांचे विषय वेगळे असावेत, व्यावसायिक मूल्य असलेली नाटकं नसावीत असा काही परीक्षकांचा दृष्टिकोन आहे. परीक्षकांनी लावलेला निकाल (काही रंगकर्मी मात्र परीक्षक ंनिकाल लावतात हा शब्दप्रयोग अधिक योग्य मानतात) पाहता हे बरोबरही आहे. दिशा आर्ट, सरस्वती प्रॉडक्शन्स आणि प्रल्हाद आर्टनिर्मित ‘बारोमास’ हे स्पर्धेच्या परीक्षकांच्या गणितांमध्ये बसणारं नाटक आहे. डॉ. सदानंद देशमुख यांच्या कादंबरीवरून रचलेलं हे नाटक. एक शेतकरी तरुण सुशिक्षित होतो, पण कुठेही नोकरी मिळत नाही. पुन्हा शेतीकडे वळतो. दरम्यान एका शहरी मुलीशी त्याचं लग्न होत. शेती व्यवसाय बुडीतखाती असतो आणि त्यात ग्रामीण व शहरी संस्कृतीचं मंथन यात तो भरडला जातो. असा एकंदर ‘बारोमास’चा बाज आहे.
लेखक-दिग्दर्शक संतोष वेरुळकर यांनी प्रचंड पटलावरील कादंबरीला दोन अंकी नाटकात आणण्याचा एक अत्यंत स्तुत्य प्रयत्न केलेला आहे. कादंबरी एका नाटकात बांधणं सोपं नव्हे. इथे तर महाराष्ट्राच्या सर्वात मोठय़ा आणि मूलभूत प्रश्नावर आधारित कादंबरी आहे. संतोषने त्याचे विविध पोत नाटकात आणले आहेत त्याबद्दल त्याचं कौतुक करायला हवं. नाटकाच्या आवाक्यामुळे काही प्रश्न अनुत्तरीत राहतात आणि ते स्वाभाविक आहे. एकंदरी संतोषने नाटकाकरिता तयार केलेली स्पेस त्यातला गाभा सादर करण्यासाठी केलेला दृश्यात्मक व्याप उत्तम उभारलेला आहे. विदारक चित्र आपल्या समोर व्यवस्थित उभं राहतं. संतोषने दिग्दर्शनात एकाचं नेपथ्याचा दोन विरुद्ध दृष्टिकोनातून केलेला उपयोग फारच छान वाटतो. त्यामुळे नाटक न रेंगाळता पुढे सरकत राहतं. नेपथ्यकार सुमित पाटीलचं इथे विषेश कौतुक. हा बदल घडवण्यात श्याम चव्हाण यांची प्रकाशयोजनाही तितकीच प्रभावी आहे.
‘बारोमास’ची गोष्ट एकनाथ भोवती फिरते. योगेश खांडेकरने एकनाथ अत्यंत सहजपणे उभा केलाय. त्याचा त्रागा प्रेक्षकांपर्यंत योगेश उत्तमरीत्या पोहोचवतो. अमृता मोडकने अलका मनस्वी उभी केली आहे. तिचं नवऱयावर असलेलं प्रेम आणि परिस्थितीविषयीची हतबलता अमृता कमालीच्या नैसर्गिकतेने साध्य करते. मधूच्या भूमिकेत संजीव तांडेल खूप प्रभावी ठरतो. मधूचा आंतरिक राग संजीवने इतका अचूक टिपलाय की पात्र अत्यंत जिवंत आणि खरं वाटतं. शेवंता झालेल्या राजश्री गढीकर भन्नाट अभिनय करतात. विशेषतः पहिल्या अंकाच्या अखेरीस असलेलं त्यांचं स्वगत मस्त जमलंय. श्रीरंग खटावकर अलकाचे वडील शोबतात आणि त्यांचा खाष्ट बाणा व्यवस्थित सादर करतात. शशिकांत म्हात्रे, नीलिमा सबनीस, श्रुती कुंटे, संतोष सरा, उमेश महाले, रोहित चौधरी, विजय वारुळे, आदित्य मांडलिक, नीर साळुंखे ही सर्व मंडळी खूप सिनसियरली कामं करतात. ‘बारोमास’ हे एक संवेदनशील विषयावरचं नेटकं नाटक आहे.
राज्य नाटय़स्पर्धा रंगकर्मींचं वर्कशॉप म्हणता येईल. इथे नवीन प्रयोग करून आपापलं कसब ताशीव करणं अपेक्षित आहे. त्यामुळे इथे सादर होणारे नाटय़प्रयोग हे प्रायोगिक नाहीत तर प्रयोगशील असावे ही अपेक्षा आहे. ‘बारोमास’या निकषावर शंभर टक्के खरं उतरतं. नेपथ्य रचनेपासून ते पात्रांच्या वावरापर्यंत आपल्याला ‘बारोमास’चा वेगळेपणा जाणवतो. संतोष वेरुळकर याने डॉ. देशमुखांच्या कादंबरीशी प्रामाणिक राहून नाटक उत्कृष्ट बेतलय. स्पर्धेच्या प्रयोगशीलतेचं भानदेखील संतोषने जपलंय. आशय, विषय आणि नाटकाबाबतची स्वतःची आत्मीयता सहकलाकारांमध्ये रुजवण्यातसुद्धा संतोष यशस्वी झालेला आहे. ‘बारोमास’मधले सगळेचं एका भारावलेल्या ऊर्जेने कार्यरत आहेत हे जाणवतं. रंगकर्मींचा हाचं गुण मराठी नाटय़सृष्टी संख्येने बलाढय़ करतं. टॅग ही ठाणे आर्ट गिल्ड ही संस्था आपल्या अंतर्गत बऱयाच संस्थांना प्रोत्साहित करत उभी आहे. ‘बारोमास’ हे टॅगच्या उपक्रमातून निर्माण झालेलं एक प्रयोगशील नाटक आहे, जे महाराष्ट्राच्या एका अत्यंत महत्त्वाच्या मुद्दय़ावर बेतलेलं आहे.
नाटक – बारोमास
निर्मिती – दिशा थिएटर्स, सरस्वती प्रॉडक्शन्स, प्रल्हाद आर्ट, ठाणे आर्ट गिल्ड
निर्माते – वैभव माने, प्रचीती पाटील, पद्मजा नलावडे
नेपथ्य – सुमीत पाटील
प्रकाश – श्याम चव्हाण
पार्श्वसंगीत – सिद्धार्थ हजारे
रंगभूषा – शरद सावंत
वेशभूषा – दीपाली ज्ञानमोठे, श्रुती कुंटे
ओवी संगीत – अमृता दीक्षित
नृत्य- हर्षदा बोरकर
लेखन, दिग्दर्शन – संतोष वेरुळकर
कलाकार – अमृता मोडक, राजश्री गढीकर, नीलिमा सबनीस, शशिकांत म्हात्रे, संजीव तांडेल, श्रीरंग खटावकर, योगेश खांडेकर
दर्जा – अडीच वर्ष




























































