
पश्चिम बंगालमध्ये नागरिकत्व दुरुस्ती विधेयकास प्रचंड विरोध होत आहे. जाधवपूर विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्याला पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांना दोन दिवस रोखल्यानंतरही विद्यार्थ्यांचा विरोध कायम आहे. पदवीदान सोहळ्यातच देबोस्मिता चौधरी या विद्यार्थिनीने चक्क नागरिकत्व दुरुस्ती विधेयकांची प्रत फाडली. यामुळे व्यासपीठावर कुलगुरू, उपकुलगुरू, रजिस्ट्रार उपस्थित असताना हा प्रकार घडल्याने काही काळ खळबळ उडाली.
मी विद्यापीठाचा अथवा पदवीचा अपमान केला नसून मला आवडीच्या विद्यापीठातून पदवी मिळाल्याचा अभिमान आहे. मात्र देशातील सध्याच्या परिस्थितीच्या विरोधात व नागरिकत्व दुरुस्ती विधेयका विरोधामुळे हे केल्याचे विद्यार्थिनीने सांगितले. आंतरराष्ट्रीय संबंध या विषयाची पदवी घेणारी देबोस्मिता चौधरी या विद्यार्थिनीच्या कारवाईमुळे विद्यापीठाने अद्याप कुठलीही कारवाई न केल्याचे सांगण्यात आले.
विद्यार्थ्यांची पदवीदान सोहळय़ाला पाठ, कुलपती म्हणून केला राज्यपालांना विरोध
पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांनी नागरिकत्व विधेयकाच्या समर्थनार्थ वक्तव्य केले होते. त्यामुळे त्यांना विरोध म्हणून दोन दिवस विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर रोखले होते. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाला कुलपतीच्या गैरहजेरीत पदवीदान सोहळा घ्यावा लागला. त्यातही अनेक विद्यार्थ्यांनी पदवीदान सोहळ्यास पाठ फिरवल्याची माहिती विद्यार्थी ए दास याने दिली. विद्यार्थ्यांना कुलपती म्हणून पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड हे नको असल्याचे सांगण्यात आले.



























































