
देशातील आघाडीच्या सर्व टेलिकॉम कंपन्यांनी 40 टक्के टॅरिफ दरवाढ केल्यामुळे यूजर्सच्या खिशाला कात्री लागली आहे. येत्या काळात ही दरवाढ अजून वाढण्याची शक्यता आहे. कारण टेलिकॉम क्षेत्रातील आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी दरवाढ गरजेची असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.
टेलिकॉम टॉकच्या एका रिपोर्टनुसार, टेलिकॉम क्षेत्राचा तोटा भरून काढण्यासाठी टॅरिफ दरवाढ करत राहणे आवश्यक आहे. असं मत सेल्युलर ऑपरेटर असोसिएशन ऑफ इंडियाचे (सीओएआय) संचालक जनरल राजन मॅथ्यूज यांनी व्यक्त केले आहे. यासोबत प्रतिग्राहक सरासरी महसूल 200 रुपये इतका वाढवणे गरजेचे आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. सीओएआयने यूजरला गुणवत्तेच्या आधारे नेटवर्क निवडता यावे यासाठी फ्लोअर प्राईस निश्चित करण्याची मागणी ‘ट्राय’कडे केली आहे. फ्लोअर प्राईस निश्चित झाल्यानंतर एअरटेलला सर्वाधिक फायदा होईल अशी शक्यता नर्तवली जात आहे. कारण सध्या हिंदुस्थानात जिओ आणि व्होडाफोन-आयडियाच्या तुलनेत एअरटेल सर्वाधिक चांगली 4 जी सेवा देत आहे.
- ‘ट्राय’ सध्या याप्रकरणी समभाग धारकांच्या प्रतिक्रियेची वाट पाहत आहे त्यानंतरच दरवाढीबाबत निर्णय घेतला जाईल. त्यामुळे येत्या काही आठवडय़ांमध्ये ही दरवाढ अजून वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
























































