
नव्या वर्षांत मुंबईच्या उपनगरीय लोकलसह लांबपल्ल्यांच्या गाडय़ांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा खिसा चांगलाच कापला जाणार आहे. कारण रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष विनोद कुमार यादव यांनी भाडेवाढीचे संकेत दिले आहेत. रेल्वे बोर्डाने प्रवासी आणि मालवाहतूक भाडय़ाला सध्याच्या काळाबरोबर तर्कसंगत बनविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
जेथे भाडे कमी आहे तेथे ते वाढविण्याचा विचार आहे तर जेथे जादा भाडे आहे तेथे कमी करण्याचा विचार असल्याचे यादव यांचे म्हणणे आहे. गेली बरीच वर्षे प्रवासी भाडय़ात वाढ करण्यात आलेली नसून दुसरीकडे रेल्वेचा खर्च मात्र प्रचंड वाढत चालला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मालवाहतुकीचे भाडे रस्ते वाहतूक क्षेत्राच्या धर्तीवर करण्याचा विचार आहे. त्यामुळे मालवाहतुकीचे भाडे उलट कमी होण्याची शक्यता आहे. सध्याच्या रेल्वेच्या भाडय़ाचा स्लॅब पाहता त्यास तर्कसंगत करण्याची गरज असल्याचे स्पष्ट झाले आहे. चालू आर्थिक वर्षांच्या दुसऱया तिमाहीत प्रवासी भाडय़ातून रेल्वेची कमाई वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत 155 कोटी रुपये आणि मालभाडय़ाच्या कमाईच्या 3,901 कोटी रुपये कमी आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल-जून) प्रवासी भाडय़ातून रेल्वेला 13,398.92 कोटीचे उत्पन्न मिळाले होते. दुसऱया तिमाहीत (जुलै-सप्टेंबर) ते घसरून 13,243.81 कोटी इतके झाले आहे.
उपनगरीय लोकलच्या भाडय़ात वाढ
रेल्वेच्या प्रवासी भाडय़ात 5 ते 40 पैसे प्रति किलोमीटर वाढ होऊ शकते. मेल-एक्स्प्रेसचे भाडेदेखील सर्व श्रेणी आणि सर्व गाडय़ांचे भाडे वाढविले जाऊ शकते. एसी कोचेसपासून साधारण कोचचे तसेच महत्त्वाचे म्हणजे उपनगरीय लोकलचे भाडे वाढविण्याचे धोरण ठरले आहे. रेल्वे भाडय़ामध्ये वाढ करण्याच्या निर्णयाला पंतप्रधान कार्यालयाने हिरवा झेंडा दाखविला आहे.
- 2 डिसेंबर रोजी संसदेत सादर करण्यात आलेल्या कॅगच्या अहवालामध्ये भारतीय रेल्वेची 2018 सालची आर्थिक परिस्थिती गेल्या 10 वर्षांतील सर्वात दयनीय असल्याचे भारताच्या नियंत्रक आणि महालेखापालांनी (कॅग) म्हटले होते. 2017-18 या वर्षात भारतीय रेल्वेची कामगिरी गेल्या 10 वर्षांच्या तुलनेत सर्वात वाईट होती. देशात सर्वाधिक रोजगार निर्माण करणारी संस्था असलेली रेल्वे 100 रुपये कमावण्यासाठी 98.44 रुपये खर्च करते.
खर्च आणि उत्पनाचा रेषो गडबडला
2017-18 या आर्थिक वर्षात भारतीय रेल्वेने आपल्या सेवांसाठी 98.44 रुपये खर्च करून 100 रुपये कमावल्याचे म्हटले आहे. याउलट 2015-16 या आर्थिक वर्षात रेल्वे 95.49 रुपये खर्च करून 100 रुपये मिळवत होती असे कॅगने आपल्या अहवालात म्हटले असून दहा वर्षांत ही परिस्थिती सर्वात वाईट मानली गेली आहे.





























































