
>> डॉ. नागेश टेकाळे
कांदा हे गरीबांचे भाकरीबरोबर पोटात जाणारे अन्न. म. गांधीनी 1936 मध्ये गरिबीबद्दल बोलताना म्हटले होते की, ‘मला माहीत नाही की, या देशामधील गरीब व्यक्ती कांदा, लसणाशिवाय कशी राहू शकेल?’ आज हाच गरीबांचा कांदा उच्चभ्रूंच्या वस्तीत जाऊन त्यांना भाववाढीचे चटके देत आहे आणि कांदा उत्पादक मात्र वळचणीला पडला आहे.
शेती आणि शेतकरी प्रश्नांचा अभ्यासक असूनही कांदा आणि त्याचे पीक हे मला मुळीच आवडत नाही आणि त्याला कारण आहे माझ्या शालेय जीवनामधील काही आठवणी. अभ्यासाला बसण्यापूर्वी जेवताना कांदा खाल्ला म्हणून बसलेला वडिलांचा मार, शाळेत कांदा खाऊन गेलो म्हणून सहकारी मित्राने ‘गुरुजी, हा कांदा खाऊन आला आहे’ म्हणून गुरुजींचा मार, घरात पाहुणे आले, त्यांच्या समोर नाव सांगावयास गेलो असता नाव सांगावयाच्या आधीच ‘कांदा खाऊन आलास वाटतं?’ हे त्यांचे शब्द आईचा एक धपाटा खाण्यास पुरे होते.
कांदा हे त्या वेळी आमच्यासारख्या गरीबाच्या घरची एक कंद भाजी. तसाच खाल्ला काय अथवा भाजीच्या रूपाने! चव ही येणारच. घरात कुणीही आले की इतर काही नाही, पण जात्याजवळ लहान टोपलीत कांदे हमखास दिसणारच. पण या काही प्रसंगाने त्याचे माझे वाकडे आले ते आलेच. सुट्टीच्या दिवशी शेतात गेल्यावर मात्र आमचा गडी अण्णाच्या जवळ बसून फडक्यात बांधून आणलेली चटणी भाकरीची न्याहरी आणि शेतातल्याच पाटाच्या पाण्यात धुतलेला पातीचा कांदा यांचा घेतलेला आस्वाद आजही मला पंचपक्वानाच्या आस्वादापेक्षाही जास्त जवळचा वाटतो.
कांदा हे महाराष्ट्रामधील सातारा, नाशिक, जळगाव, पुणे, सोलापूर आणि नगर जिल्हय़ामधील शेतकऱयांचे पीक. राज्यामधील 95 टक्के कांदा या सहा जिल्हय़ांत पिकतो. त्यात नाशिक प्रथम स्थानावर आहे. भौगोलिक परिस्थिती आणि मातीमध्ये असणारी वालुकामय कणांची संख्या सोबत त्यात स्फुरद आणि गंधक मुबलक असल्याने येथील शेतात कांदा मुबलक पिकतो. मात्र वर्षातून तीन वेळा उत्पन्न घेऊनही शेतकरी कांदा पिकात चार पैसे आनंदाने कमविताना आढळत नाही. लासलगाव या जगातील सर्वात मोठय़ा कांदा बाजारपेठेमध्ये कांद्याला भाव नाही म्हणून त्याला रस्त्याच्या कडेला फेकून दिलेल्या शेतकऱयांच्या वेदना मी पाहिल्या आहेत. कष्टाने घाम गाळून पिकवायचे आणि मातीमोल किमतीने विकायचे याचे काय दुःख असते ते शेतकरी झाल्याशिवाय कसे समजणार?
या वर्षी पन्नास वर्षात झाला नाही एवढा पाऊस झाला आणि कांदा उत्पादकांची झोप उडाली. खरिपाच्या पहिल्या व दुसऱया उशिराच्या सत्रात पावसाने या कंद पिकाला वाहून नेल.s जे थोडे उत्पन्न मिळाले ते शेतकऱयांना लगेच बाजारात विकावे लागले. कारण त्यात पाणी जास्त असल्याने ते टिकावू नव्हते म्हणून साठवूनही ठेवता आले नाही. म्हणून कांदाटंचाई सुरू झाली. केंद्राने कांदा निर्यात थांबवली आंिण आयात वाढवली. व्यापारी लोकांच्या साठय़ावर नियंत्रण ठेवले. जिल्हाधिकाऱयांना शिक्षेचे अधिकार दिले, पण कांदा काही उतरण्याचे नाव घेत नव्हता. ग्राहकांच्या डोळय़ात आलेले अश्रू आता डिसेंबरमध्ये अश्रुधारेत रूपांतरित झाले. कांद्याने 30 रु. किलोपासून 200 रु. किलोला स्पर्श केला. पण महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना काय मिळाले? काही शेतकऱयांजवळ उन्हाळी कांदा शिल्लक होता. दोन पैसे मिळण्याची शक्यता होती आणि त्यांना ते मिळालेही, पण त्याच वेळी इजिप्तचा कांदा बाजारात आला. महाराष्ट्रात दररोज सहा हजार टन कांदा ग्राहकांच्या पोटात जातो. आपण किती आयात करणार? आयात केलेला कांदा आठवडाभरसुध्दा पुरणार नाही म्हणून कांदा असा वाढतच जाणार!
शेतकऱयाला दोन पैसे मिळू न देता मधल्या दलालास श्रीमंत करण्याचे आम्हा मध्यमवर्गीयांचे धोरण कांद्याचे भाव स्थिर होऊ देत नाही हे सत्य आहे. देशामधील 18 टक्के कांदा महाराष्ट्रात पिकत असूनही आमचा कांदा उत्पादक शेतकरी आज आंनदी नाही. एक आठवडय़ापूर्वी मी कर्नाटकातील चित्रदुर्गमधील मल्लिकार्जुन या एका कांदा उत्पादक शेतकऱयाची श्रीमंती ऐकली आणि चकीत झालो. मागच्या वर्षी कर्ज काढून त्याने त्याच्या शेतात कांदा उत्पादन घेतले आणि 15 लाख गुंतवणूक करून 5 लाख मिळवले. या वर्षीही त्याने पुन्हा कर्ज काढून दहा एकरावर कांदा लावला. पावसामध्ये सुध्दा हिंमत न हारता त्याने 240 टन म्हणजे 20 ट्रक कांद्याचे उत्पादन घेतले आणि नोंव्हेबरच्या शेवटी 200 रु. किलो भाव मिळवून त्याने कोटी रुपयांचा नफा मिळवला. असे शेतकरी आमच्याकडे का तयार होत नाहीत? कोटी नकोत, पण काही हजार, लाख रुपये तरी त्यांना का मिळू नयेत? आमचा शेतकरी आजही काळय़ा मातीमधलाच शेतकरी आहे, तो व्यापारी होऊ शकत नाही याची खंत वाटते. ज्या पिकाचा शेतकऱयांना फायदा होत नाही, ज्यामुळे तो अनेकवेळा नुकसानीत जातो, ते पीक मला का आवडावे?
आजही मला आठवते की, दिवंगत शेतकरी नेते शरद जोशी यांनी शेतकऱयांच्या शेती उत्पादनाला योग्य भाव आणि सन्मान मिळावा म्हणून आंदोलन छेडले होते तेव्हा कांद्याचा भाव जेमतेम 1 रु. किलो होता. याच एक रुपयावर दोन शून्य ठेवून कांदा उत्पादकांना 100 रु. किलो भाव मिळावयास हवा यासाठी ते आग्रही होते. पण असे घडले नाही. आजही फेब्रुवारीमध्ये दुष्काळाच्या फेऱयात सापडलेल्या कांदा शेतकऱयांनी दोन, तीन रु. किलो दराने विकला. नंतर तो वाढू लागला तो दहाच्या पटीतच. काही उत्कृष्ट प्रतिचा कांदा 200 रु. भाव खाऊन गेला. आता उन्हाळी कांदा बाजारात येईपर्यंत त्याचे भाव कमी होत नाहीत हे निश्चित. पण याचा फायदा शेतकऱयांना होणार का? हा प्रश्नच आहे. कारण, आमची कांदा साठवण क्षमता खूपच कमी आहे आणि साठवणुकीच्या आधुनिक तंत्रज्ञानापासून आम्ही अजूनही खूपच मागे आहोत.
कांदा हे गरीबांचे भाकरीबरोबर पोटात जाणारे अन्न. म. गांधीनी 1936 मध्ये गरिबीबद्दल बोलताना म्हटले होते की, ‘मला माहीत नाही की, या देशामधील गरीब व्यक्ती कांदा, लसणाशिवाय कशी राहू शकेल?’ आज हाच गरीबांचा कांदा उच्चभ्रूंच्या वस्तीत जाऊन त्यांना भाववाढीचे चटके देत आहे आणि कांदा उत्पादक मात्र वळचणीला पडला आहे.
अठरा पुरणामधील विविध कथांमधून देवदेवतांनी दुष्ट प्रवृत्ती नष्ट केल्याचे पाहावयास मिळते. त्यापासून पुराण वाचणाऱयाने काहीतरी बोध घ्यावा हीसुध्दा अपेक्षा असते. कांद्याचा जन्म 5000 वर्षापूर्वीचा, त्याच्या पुराणातून कांदा उत्पादक शेतकरी, कांद्याच्या भावावर नियंत्रण ठेवणारे शासन, दलाल आणि कांदा खरेदी करणारे ग्राहक यांनी बोध घेण्यासारखे भरपूर आहे. फक्त कांदा उत्पादक देवतेवर अन्याय होऊ नये एवढीच अपेक्षा.
चीन कांदा उत्पादनात जगात प्रथम क्रमांकावर आहे. आकाराने भला मोठा पण कमी तिखट असलेला तो कांदा तिखट पदार्थापासून दूर पळणाऱया विदेशी लोकांच्या जेवणाच्या टेबलवरच्या सॅलाडमध्ये राजासारखा विराजमान असतो. माझ्या चीनच्या भेटीत एका मित्राच्या घरी मी तो कांदा काकडीसारखा कच्चा खाल्ला. हिंदुस्थानी कांद्याला जो तिखटपणा आणि चव असते ती त्याला नव्हती. दर्जेदार कांदा उत्पादन आमची माती देते. मात्र पाच सहा आकडी पगार मिळवणाऱयांच्या भाववाढीच्या आक्रंदनापुढे त्यांच्या जिभेचे चोचले पुरविण्यासाठी आम्ही त्याला मातीमोल किंमत देतो. किंमत वाढली तर आयात वाढवतो, बहुमोल परकीय चलन खर्च करतो. पण शेतकऱयांना बळ देत नाही. उत्पादनावर सर्व खर्च वजा करून कांदा उत्पादकांना 50 टक्के नफा दिला तर शेतकरी मोठय़ा प्रमाणावर कांदा उत्पादन घेतील आणि देशांतर्गत त्याचा भावही नियंत्रणाखाली राहू शकेल, सोबत निर्यातही वाढेल.
(लेखक कृषीतज्ञ आहेत)
– [email protected]



























































