
लाखो, करोडो शिवसैनिकांच्या लाडक्या माँसाहेब स्वर्गीय सौ. मीनाताई ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या रमाधाम वृद्धाश्रमातील आजी-आजोबांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. मुख्यमंत्र्यांनी खास नागपूरहून आणलेल्या संत्राबर्फीने या आजी-आजोबांचे तोंड गोड केले. ‘औक्षवंत व्हा, यशस्वी व्हा आणि महाराष्ट्राला नंबर वन बनवा’, असे भरभरून आशीर्वाद या
आजी-आजोबांनी दिले.
मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे प्रथमच आज रमाधाममध्ये ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद घेण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी रमाधाममधील नव्या इमारतीच्या बांधकामाची पाहणी केली. रमाधाममधील आजी-आजोबांनी मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या उद्धव ठाकरे यांचा पुष्पगुच्छ आणि शाल-श्रीफळ देऊन सत्कार केले. हा सत्कार माझा सर्वात मोठा सत्कार आहे, अशी कृतज्ञता व्यक्त करत उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद घेतले. यावेळी नव्याने आकारास येणाऱया रमाधामच्या भव्य प्रशस्त इमारतीची व विविध फुला-फळांनी बहरास येणाऱया बागेची पाहणी करून उद्धव ठाकरे यांनी समाधान व्यक्त केले. तहसीलदार इरेश चप्पलवार व महसूल अधिकारी भरत सावंत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र मुख्यमंत्र्यांना भेट दिले.
यावेळी रमाधाम वृद्धाश्रमाचे अध्यक्ष चंदूमामा वैद्य, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेंद्र थोरवे, आमदार रवींद्र वायकर, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, रायगड जिल्हा सल्लागार बबन पाटील, माजी जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे, खालापूर तालुकाप्रमुख संतोष विचारे, शहरप्रमुख सुनील पाटील, महिला आघाडीच्या प्रिया जाधव-खेडेकर, नगराध्यक्षा सुमन औसरमल, उपनगराध्यक्षा विनीता कांबळे, स्थानीय लोकाधिकार समितीचे वामन भोसले, जिल्हाधिकारी जगताप, प्रांताधिकारी वैशाली परदेशी, तहसीलदार इरेश चप्पलवार, नगरसेविका मामी शेलार, दिलीप पुरी, अमृत पालीवाला यांच्यासह असंख्य मान्यवर उपस्थित होते.
























































