
निलंगा तालूक्यातील मौजे बोरसुरी येथील अवैध दारुविक्रेत्यावर कारवाई होत नसल्याने संतप्त झालेल्या गावातील महिला, पुरुष, युवकांनी कायदा हातात घेऊन दारु तयार करण्याचे रसायन, दारुच्या बाटल्यांची तोडफोड केली. आता त्यांच्यावरच औराद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे सर्वत्र संतप्त प्रतिसाद उमटत आहेत.
निलंगा तालूक्यातील मौजे बोरसुरी येथे घरांमधून अवैध दारुची विक्री केली जात होती. पोलीसांकडे तक्रारी करुनही दखल घेण्यात येत नव्हती. त्यामुळे गावातील महिला, पुरुष, युवकांनी एकत्र येऊन अवैध दारूविक्रेत्याविरुध्द कायदा हातात घेऊन तोडफोड केली. दारुच्या बाटल्या फोडून टाकल्या होत्या. या प्रकरणी कर्तव्यदक्ष असणाऱ्या पोलीसांनी आत अवैध दारुविक्री करणाऱ्यांच्या फिर्यादीवरुन सुमारे 30 ते 35 जणांविरुध्द गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे या अवैध दारु विक्रेत्याविरुध्दच्या आंदोलनात सहभागी झालेल्या महिला, पुरुष, युवकांना अटक होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.































































