
जालना जिल्ह्यातील जालना-संभाजीनगर मुख्य रस्त्यावर रविवारी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास गेवराई फाट्याजवळ कंटनेरवाहतूक करणारा ट्रेलर व जेसीबीची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. संजीवनी ट्रान्सपोर्टचा मोठा कंटनेर वाहतूक करणारा ट्रेलर संभाजीनगरच्या दिशेने जात असताना रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे वेगाने दुभाजक ओलांडून दुसऱ्या बाजूला गेला. त्याचवेळी समोरून येणाऱ्या जेसीबीला तो धडकला. या अपघातात वाहनातील दोनजण जागीच ठार झाले. मृतांमध्ये कंटनेरचा चालक विठठल रंगनाथ बरबडे (वय 25, रा. पाचेगाव, ता. गेवराई, जि. बीड) व ट्रेलरचालक यांचा समावेश आहे. त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी बदनापूर येथील शासकीय ग्रामीण रूग्णालयात पाठवण्यात आले आहेत. या अपघातात एकजण गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी वरूडी येथील रूग्णालयात पाठवण्यात आले आहे.
अपघाताचे वृत्त कळताच बदनापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांच्यासह सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आय. जी. शेख, वनारसे, वाहतूक शाखेचे शिवाजी पोहार यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन उपस्थित जमावाच्या मदतीने वाहतूक सुरळीत केली व जखमींना रुग्णालयात दाखल केले.


























































