येडियुरप्पा अधिकारात नसलेल्या घटकाबाबत बोलतात!, एन.डी. पाटील यांची सुनावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एका क्षुल्लक कानडी संघटनेच्या भुरट्या नेत्याच्या वक्तव्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न पेटलेला आहे. त्यातच कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी यात आज नाहक भडका उडवण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्राला एक इंचही जमीन देणार नाही, अशी उद्दामपणाची भाषा करणार्‍या येडियुरप्पांना सीमा लढ्याचे ज्येष्ठ नेते एन.डी. पाटील यांनी चांगलेच सुनावले. त्यांच्या अधिकारात नसलेल्या घटकाबाबत ते बोलत आहेत. सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या या सीमा प्रश्नी केवळ तारखेवर तारीख वाढवून घेण्याचेच काम ते करीत असल्याची चपराक एन.डी. पाटील यांनी लगावली.

कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या भीमाशंकर पाटील या क्षुल्लक नेत्याने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांविषयी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटक असा तणाव निर्माण झाला आहे. त्यातच आज कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी ‘‘महाजन आयोगानुसार दोन राज्यांतील सीमावाद संपलेला आहे. सीमावाद निर्माण होण्याचा आता प्रश्नच नाही. त्यामुळे महाराष्ट्राला एक इंचही जमीन देणार नाही,’’ असे मराठी भाषिकांना डिवचणारे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्याचा समाचार सीमा लढय़ाचे ज्येष्ठ नेते प्रा. एन.डी. पाटील यांनी घेतला आहे.

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेले वक्तव्य दुर्दैवी आहे. ते त्यांच्या अधिकारात नसलेल्या घटकाबाबत बोलत आहेत. येडियुरप्पांना सीमावाद वाढवायचा आहे. म्हणूनच ते अशा प्रकारची वक्तव्ये करीत असून ते आडमुठेपणाची भूमिका घेत आहेत. दोन्ही राज्यांच्या सीमावादाचा प्रश्न सोडवणे हे सर्वोच्च न्यायालयाचे काम असून तिथे हा निवाडा सुरू आहे. त्यासाठी मराठी भाषिकांच्या वतीने 70 हजार पानांचे पुरावे सादर करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.