
हार देण्यासाठी गेलेल्या तरुणाने पिण्यासाठी पाणी मागण्याचा बहाणा करीत 50 वर्षीय गृहिणीचा विनयभंग केल्याची घटना शीव येथे घडली. पोलिसांनी शुभम् दरेकर (22) या तरुणाला अटक केली आहे.
शीव परिसरातील एका सोसायटीत त्या 50 वर्षीय गृहिणी कुटुंबासोबत राहतात. शुभम् हा त्याच परिसरात असलेल्या हार विक्रेत्याकडे कामाला होता. तो नियमित त्या महिलेच्या घरी जाऊन हार द्यायचा. त्याप्रमाणे 27 तारखेच्या सायंकाळी देखील शुभम् हार देण्यासाठी गेला. त्यावेळी त्याने महिलेकडे पाणी प्यायला मागितले. त्यामुळे महिला पाणी आणण्यासाठी स्वयंपाकघरात गेली. मग हीच संधी साधत शुभम् घरात घुसला आणि कोचवर जाऊन बसला. ती महिला पाणी घेऊन येताच शुभम्ने अश्लील चाळे करून दाखवले. महिलेने आरडाओरड करताच नागरिकांनी पकडून त्याला शीव पोलिसांच्या ताब्यात दिले.
























































