
जामखेड पंचायत समिती सभापतीपदाच्या सोमवारी निघालेल्या सोडतीत नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाले. त्यानंतर जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी जिल्ह्यातील 14 पंचायत समिती सभापती, उपसभापती निवडीचा कार्यक्रम घोषित केला आहे. येत्या 7 जानेवारी रोजी संबंधित पंचायत समितीच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया होणार आहे. यासाठी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या 14 अधिकार्यांची पीठासन अधिकारी म्हणून जिल्हाधिकार्यांनी नियुक्ती केली आहे. यामुळे मागील 15 दिवसांपासून पडलेला पंचायत समिती सभापतीपद निवडीचा तिढा अखेर सुटला आहे.
जिल्ह्यातील 14 पंचायत समिती सभापतीपदांच्या आगामी काळातील आरक्षणाची सोडत गुरुवारी 12 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनाच्या सभागृहात झाली. राज्य शासनाच्या राजपत्राद्वारे ग्रामविकास विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार जिल्ह्यातील 14 सभापतीपदांच्या आरक्षणाची सोडतीची प्रक्रिया झाली. या सोडतीत जामखेड पंचायत समिती सभापतीचे आरक्षण अनुसूचित जमातीसाठी निश्चित झाले. मात्र, या पंचायत समितीमध्ये अनुसूचित जमाती प्रवर्गाचा एकही सदस्य नसल्याने सोडतीदरम्यानच जिल्हाधिकारी व्दिवेदींचे लक्ष वेधण्यात आले. त्यावर अशा परिस्थितीत ग्रामविकास विभागाकडून तत्काळ मार्गदर्शन मागविण्यात येईल, असे व्दिवेदी यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार लगेच दुसर्या दिवशी शुक्रवारी जामखेड पंचायत समितीतील गणाची नावे व प्रवर्गासह नोंदवीत पुढील मार्गदर्शनाचा प्रस्ताव ग्रामविकास खात्याकडे रवाना करण्यात आला. अखेर जामखेड सभापती आरक्षणाच्या संदर्भात मार्गदर्शक निर्देश दिलेले ग्रामविकास खात्याचे पत्र जिल्हा प्रशासनास 27 डिसेंबर रोजी प्राप्त झाले. त्यावर सोमवारी जामखेडच्या सभापतीपदाच्या आरक्षणाची सोडत जिल्हाधिकारी यांच्या बैठक कक्षात घेण्यात आली. यावेळी महसूल शाखेचे उपजिल्हाधिकारी ऊर्मिला पाटील, तहसीलदार वैशाली आव्हाड, अव्वल कारकून नीता कदम, लिपिक प्रवीण कांबळे यांच्यासह जामखेड पंचायत समितीचे भगवान मुरूमकर, राजश्री सुर्यकांत मोरे, मनीषा रवींद्र सुरवसे, सुभाषराव आव्हाड हे चारही सदस्य आणि जामखेड परिसरातील कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी अनुसूचित जमाती वगळून अनुसूचित जाती, नागरीकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण महिला अशा तीन चिठ्ठ्या टाकण्यात आल्या. या सोडतीत जामखेडचे सभापतीपद नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी निघाले. या सोडतीनंतर जिल्हाधिकार्यांच्या आदेशाने महसूल शाखेच्या उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील यांनी जिल्ह्यातील 14 पंचायत समिती सभापती व उपसभापती पदाच्या निवडीची नोटीस जारी केली.
सभापती, उपसभापती निवडीचा कार्यक्रम
मंगळवार 7 जानेवारी 2020, ठिकाण – पंचायत समित्यांचे सभागृह, अर्ज दाखल करण्याची मुदत – सकाळी 11 ते दुपारी 1 वाजपर्यंत, छाननी, माघार व निवडणूक – दुपारी 3 वाजता
14 पीठासन अधिकारी – महेश पाटील (अकोले), जितेंद्र पाटील (संगमनेर), पंकज चौबळ (कोपरगाव), गोविंद शिंदे (राहाता), अनिल पवार (श्रीरामपूर), शाहूराज मोरे (नेवासे), चंद्रशेखर देशमुख (शेवगाव), देवदत्त केकाण (पाथर्डी), श्रीनिवास अर्जुन (नगर), अजय मोरे (राहुरी), सुधाकर भोसले (पारनेर), रोहिणी र्नहे (श्रीगोंदे), अर्चना नष्टे (कर्जत), जयश्री माळी (जामखेड).






























































