आंध्र प्रदेशमध्ये चंद्राबाबू नायडूंचे राज्य सरकारविरोधात आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आंध्र प्रदेशमध्ये माजी मुख्यमंत्री आणि तेलुगु देशम पक्षाचे अध्यक्ष एन. चंद्राबाबू नायडू यांनी राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन पुकारले आहे. नायडू सपत्नीक आंदोलनाला बसले आहेत. आंध्रचे मुख्यमंत्री जगमोहन रेड्डी यांनी राज्यात तीन राजधानींचा प्रस्ताव ठेवला आहे. या प्रस्तावाच्या विरोधात नायडू यांनी आंदोलन पुकारले आहे.

मुख्यमंत्री जगमोहन रेड्डी यांनी तीन राजधानींचा प्रस्ताव ठेवला आहे. आंध्र प्रदेश राज्याची विभाजन झाल्यानंतर आंध्र आणि तेलंगाणाची हैदराबाद ही संयुक्त राजधानी आहे. चंद्राबाबू नायडू जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी राज्याची आगामी राजधानी अमरावती असल्याचा निर्णय घेतला. त्यानुसार अनेक प्रकल्पही सुरू केले होते. जगमोहन रेड्डी यांनी मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार घेतल्यानंतर हे सर्व प्रकल्प त्यांनी स्थगित केले. राज्याला तीन राजधानी असाव्या असा प्रस्ताव रेड्डी यांनी घेतला आहे. त्यानुसार विशाखापट्टणम ही नोकरशाहीची राजधानी असेल. विशाखापट्टणमध्येच सचिवालय असेल. करनुलमध्ये न्यायिक राजधानी असणार आहे. तसेच अमरावती ही विधीमंडळाची राजधानी असेल.

या निर्णयाला माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी जोरदार विरोध केला आहे. अमरावतीमध्येच उच्च न्यायालय, सचिवालय आणि विधीमंडळ आहे, मुख्यमंत्र्यांच्या निर्णयामुळे अमरावरी शहराचे नुकसान होऊ शकते असे नायडू म्हणाले आहेत. विशाखापट्टणमाच्या अनेक शेतकर्‍यांनीही या निर्णयाला विरोध केला आहे. शेतकर्‍यांनी राष्ट्रपती रामनथ कोविंद यांना पत्र लिहून न्याय देण्याचीही मागणी केली आहे.