
विधानसभा निवडणुकीत भाजपने जेवढय़ा जागा लढवल्या त्यापैकी 70 टक्के जागांवर विजय झाला. भाजप नावाचा विद्यार्थी वर्गात पहिला, मेरीटमध्ये आला, पण या हुशार विद्यार्थ्याला वर्गाबाहेर काढले आणि 40 टक्के गुण मिळविणारे तीन विद्यार्थी एकत्र आले, अशी खदखद माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केली.
पालघर जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी कासा येथे भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील भाजपची सत्ता गेल्याने अक्षरशः थयथयाट केला. संतापाच्या सुरात ते म्हणाले, ज्या पक्षाला सोबत घेऊन विधानसभा निवडणुकीच्या वेळी प्रचार केला त्याने जनादेश मिळूनही दुसऱयासोबत घरोबा केला. म्हणूनच आम्हाला विरोधी पक्षामध्ये बसावे लागले असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.
रिकाम्या खुर्च्यांसमोर भाषण
राज्याचे मुख्यमंत्रीपद सांभाळलेल्या देवेंद्र फडणवीस यांची अवस्था सध्या ‘ना घर का.. ना घाट का’ अशी झाल्याचे आज दिसून आले. फडणवीस हे विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी सांभाळत आहेत, पण त्यांच्यावर पालघर जिल्हा परिषद तसेच पंचायत समित्यांच्या निवडणुकीत प्रचार करण्याची वेळ आली. विशेष म्हणजे ‘कासा’ या छोटय़ाशा गावातील सभेतही रिकाम्या खुर्च्या दिसत होत्या. या खुर्च्यांसमोरच फडणवीस यांना भाषण करावे लागले.




























































