
रेल्वेनंतर मुंबईची दुसरी लाइफलाइन असलेल्या ‘बेस्ट’च्या ताफ्यात 25 मिनी एसी बस दाखल झाल्या आहेत. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख-कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आज दिमाखदार सोहळ्यात या मिनी एसी बसचे लोकार्पण करण्यात आले. ‘बेस्ट’च्या या 21 आसनी मिनी बसमधील प्रवास मुंबईकरांना मर्सिडीजच्या सफरीचा अनुभव देणारा ठरणार आहे.
मुंबईकरांना परिवहन सेवा देण्यासाठी बेस्टच्या सुमारे 3100 गाडय़ा विविध मार्गांवर धावत आहेत. या गाडय़ांमधून सध्या 30 लाखांवर प्रवासी सुविधेचा लाभ घेत आहेत. यामध्ये प्रवाशांना आणखी दर्जेदार सुविधा देण्यासाठी बसगाडय़ांची संख्या दहा हजारांवर नेण्याचे धोरण ‘बेस्ट’ प्रशासनाकडून आखण्यात आले आहे. यामध्ये वर्षभरात इलेक्ट्रिक, एसी, मिनी-मिडी गाडय़ा प्रवाशांच्या सेवेत आणल्या जाणार आहेत. आगामी एका वर्षात गाडय़ांचा ताफा दहा हजारांवर नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यानुसार गेल्या काही दिवसांत 35 इलेक्ट्रिक बस आणि 30 वातानुकूलित बस चालवण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये आता आणखी 25 मिनी बसची भर पडली आहे. या बसच्या लोकार्पण सोहळ्यास ‘बेस्ट’ समिती अध्यक्ष अनिल पाटणकर, सदस्य सुहास सामंत, महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे, अतिरिक्त महाव्यवस्थापक राजेंद्र मदने आदी मान्यवर उपस्थित होते.
एकूण 400 मिनी बस आणणार
मुंबईकरांसाठी ‘बेस्ट’ 400 मिनी-मिडी प्रकारच्या वातानुकूलित बस आपल्या ताफ्यात आणणार आहे. या गाडय़ा सात वर्षांसाठी भाडेतत्त्वावर घेऊन चालवल्या जाणार आहेत. याचे भाडेही नियमित बसप्रमाणे माफकच राहणार आहे. सात वर्षांच्या उपक्रमासाठी बेस्टला 284 कोटी रुपये खर्च येणार आहे.
असा राहणार बसमार्ग, ‘बेस्ट’च्या नव्या वातानुकूलित गाड्या
- बस मार्ग ए-110 – वडाळा रेल्वे स्थानक ते विद्यालंकार-संगमनगर बस थांबा-वडाळा ब्रिज, बरकत अली दर्गा या मार्गावर चालणार आहेत. यामध्ये पहिली बस सकाळी 6.15 वाजता तर शेवटची बस मध्यरात्री 12 वाजेपर्यंत असेल.
- बस मार्ग ए-174 – वडाळा रेल्वे स्थानक ते भरणी नाका बस थांबा – वडाळा ब्रिज, बरकत अली दर्गा असा राहणार असून या मार्गावर पहिली बस सकाळी 6.15 तर शेवटची बस मध्यरात्री 12 वाजेपर्यंत असेल.






























































