लोकलचे दरवाजे अचानक बंद झाले, प्रवाशांची घाबरगुंडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतली एक दुपार. नेहमीप्रमाणे एक विरार लोकल चर्चगेट स्थानकात दाखल झाली. प्रवासी ट्रेनमध्ये चढून बसले. ट्रेन सुटायची वेळ झाली तसे अचानक ट्रेनचे दरवाजे आपोआप बंद झाले आणि प्रवाशांची चांगलीच घाबरगुंडी उडाली. काही प्रवाशांनी घाबरून दरवाजे उघडण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे, या सगळ्यात चर्चगेट स्थानकात सुरू असलेल्या एका घोषणेकडे आधी प्रवाशांचं लक्षच गेलं नाही. ती घोषणा होती स्वयंचलित दरवाज्यांच्या लोकलच्या चाचणीची.

गुरुवारी पश्चिम रेल्वेच्या 15 डब्यांच्या चर्चगेट-विरार लोकलमध्ये या दरवाजांची चाचणी घेण्यात आली. इतर वेळी ही ट्रेन 12 डब्यांची असते, मात्र फक्त चाचणीसाठी तिला तीन डबे जोडण्यात आले होते. जेव्हा ही लोकल चर्चगेट स्थानकात आली तेव्हा प्रवाशांना दरवाजांवर नारिंगी रंगाचा लाईट लागताना दिसत होता. ट्रेन सुटण्यापूर्वी या नारिंगी रंगाच्या लाईटचा इशारा झाला आणि अचानक दरवाजे बंद झाले. यामुळे प्रवासी चांगलेच घाबरले. त्याचवेळी चर्चगेट स्थानकात या लोकलची घोषणाही करण्यात येत होती. पण, दरवाजे आपोआप बंद झाल्यानंतर सूचना न ऐकता काही घाबरलेल्या प्रवाशांनी ते स्वतःहून उघडण्याचाही प्रयत्न केला. सुदैवाने फारशी गडबड न होता चाचणी पार पडली. ही चाचणी पूर्ण झाल्यानंतर आता पुढील 15 दिवसांमध्ये दोन वेळा पुन्हा चाचणी घेण्यात येणार आहे. या चाचण्यांनंतर रेल्वेकडे अहवाल सादर होईल. मात्र, अशा प्रकारच्या योजनेसाठी रेल्वेचे डबे एकमेकांना अंतर्गत जोडलेले असणं जास्त सोयिस्कर असल्याचं पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

दुसरीकडे, प्रवाशांनी या स्वयंचलित दरवाज्यांविषयी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरवाजे हा डब्यात हवा खेळती राहण्याचा मुख्य स्रोत असल्याने ते बंद झाले तर ऐन गर्दीच्या वेळी प्रवासी घुसमटतील. त्यामुळे दरवाजे स्वयंचलित ठेवण्यापूर्वी डब्यातल्या व्हेंटिलेशनची वेगळी व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. तर गर्दीच्या वेळी कुणीतरी लोकांना आत ढकलण्याची गरज असून दरवाजे बंद झाल्यानंतरही काही प्रवासी लटकू शकतात, त्याचाही बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे.