
>> वरद चव्हाण
बहुतेक जणांचा नव्या वर्षाचा संकल्प जीममध्ये जाण्याच्या, चालण्याच्या निश्चयाने सुरू होतो… पण खरोखरच जर हा संकल्प जिद्दीने वर्षभर चालवलात तर यापुढची सगळी वर्षं खरंच आरोग्यपूर्ण असतील…
नमस्कार फिटनेस फ्रिक्स! हा 2020 मधला माझा पहिला लेख आहे. मार्च 2019 पासून माझा एक नवीन प्रवास सुरू झाला. लेख लिहिण्याचा, फिटनेस टीप्स देण्याचा प्रवास. ‘सामना’सारख्या नामांकित वृत्तपत्तामध्ये आपल्याला अशी एक संधी मिळेल. याचा मी खरच विचार केला नव्हता. आजपर्यंत अनेक कलाकारांचा फिटनेस फंडा तुमच्यापर्यंत पोहोचवला. पण म्हटलं 2020 उजाडत आहे. हा लेख जरा वेगळा करू. मग विचार केला की सेलिब्रिटींचा लेख न लिहिता, एका अशा गोष्टीवर लेख लिहायला हवा जो आपल्या मधला प्रत्येक जण नव वर्षाच्या सुरुवातीला करतोच करतो आणि ती गोष्ट म्हणजे ‘नवीन वर्षाचा संकल्प’! आज 4 जानेवारी 2020. 31 डिसेंबर 2019 ते आजपर्यंत तुम्हीच तुमच्या व्हॉट्स ऍप, फेसबुक, इन्स्ट्राग्राम अशा अनेक सोशल अकाऊंटवर तुमच्याच मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईकांचे नवीन वर्षाचा संकल्प म्हणून अनेक पोस्ट पाहिले असतीलच. प्रत्येकाचे ‘नवीन वर्षाचे संकल्प’ पाहून आपणही काहीतरी संकल्प करायलाच हवा अस प्रत्येकाला वाटत आणि सोशल मीडियावर पोस्ट करण्यासाठी का होईना, पण आपण आपला संकल्प सर्वांसमोर जाहीर करून टाकतो. प्रत्येकाचा संकल्प वेगळा असतो. पण जर तुम्ही सगळे संकल्प नीट पाहिलेत तर तुमच्या लक्ष्यात येईल की जवळ जवळ 80-80 टक्के संकल्प हे स्वतःची तब्येत आणि फिटनेस बाबतीत असतात.
पण या संकल्पनांचे पुढे काय होते? 90-95 टक्के संकल्प जानेवारीच्या दुसऱयाच आठवडय़ात का तुटतात? यामागे एक कारण असू शकत की साधारण 25 डिसेंबर ते 2 जानेवारीपर्यंत आपण सुटीच्या मूडमध्ये असतो. आपल्या रोजच्या धावपळीच्या आयुष्यातून आपल्याला खऱया अर्थाने जरा ब्रेक मिळतो. कितीही नाही म्हटलं तरी आपले हे वर्ष कस गेले? आपण काय केले? काय करायचा राहून गेले? या वर्षी आपली तब्येत मागच्या वर्षीच्या तुलनेत खराब झाली की सुधारली? आपण तब्येत खाण्याकडे दुर्लक्ष्य केल्यामुळे अधिक जाड किंवा बारीक झालोय! या सारखेच अनेक विचार वर्षांच्या शेवटी प्रत्येकाच्या मनात येतात आणि आतापर्यंत जे गमावल ते येणाऱया वर्षात तरी कमावू अशा विचाराने हे ‘नवीन वर्षाचे संकल्प’ लोक करत असावेत. पण जसं आपलं रुटीन परत रुळावर येते. जॉबची धावपळ, मुलाची, शाळा, संसाराची गणितं सोडवेपर्यंत हे सगळे संकल्प ज्या गतीने आपल्या मनात येतात, त्याच गतीने आपल्याला त्याचा विसर पडतो. पण जर खरच तुम्हाला स्वतःच्या तब्येतीची काळजी असेल, चांगल आयुष्य जगण्याची इच्छा असेल तर या साली खास करून तब्येतीच्या बाबतीत जो काही संकल्प कराल तो पूर्ण करा. व्यवसाय, अभिनय क्षेत्र किंवा क्रीडापटुंवरही जो मानसिक ताण असतो. याच ताणामुळेच आज अनेक तरुणांना वयाच्या तिशीतच ब्लड प्रेशरचा त्रास सुरू झाला आहे तर काहींना ‘मनोचिकित्सक’ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागत आहे. याच डेडलाईन्सच्या वर्क प्रेशरमुळे अनेकांना वयाच्या चाळीशीत हृदयविकाराचा त्रास होतोय. घाबरू नका, अजूनही परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही. खऱया अर्थाताने आज आपण मनाने फिट आणि स्थिर असण जास्त गरजेच आहे. उदा. आज ज्या गृहिणी हाऊस वाईफ आहेत. त्यांना त्यांच्या त्या 4 भिंतीच्या बाहेर पडणं अत्यंत गरजेच आहे. नवरा, सासू-सासरे, मुलं यांची काम करून झाल्यावर जेवणाची तयारी करता करता टिव्हीसमोर मालिका बघत बसल्याने तुमचे मन आणि शरीर दोन्ही स्थूल होऊन जाते. यापेक्षा संध्याकाळच्या वेळेत 30-40 मिनिट हा होईना भर-भर चालून बघा! एकदा का शरीरातून घामाच्या धारा वाहू लागल्या, शरीरात ब्लड सर्क्युलेशन वाढलं की आपोआप कस फ्रेश वाटत बघाच! तसेच आजकल अनेकांना ‘जाडेपणा’ या समस्येने घेरले आहे. खरं सांगू का? तर थोडय़ाफार प्रमाणात जर आपण ‘जाड’ असू तर त्यात लाज वाटण्यासारख काहीच नाही.
माझ्या मित्र-मैत्रीणी इतक्या बारीक कशा काय? मलाही असंच दिसायला हव किंवा किती जाड झाली आहेस! कोण करणार तुझ्याशी लग्न? असे टोमणे कानावर पडतच असतात. आपलं लग्न लवकर व्हावं म्हणूनसुद्धा अनेकजण व्यायाम सुरू करतात. व्यायाम सुरू करायला कारण काही असो तो नियमितपणे करण महत्त्वाचं आहे. त्याचप्रकारे बारीक असणं म्हणजेच फिट असणं नाही. वजन हे कंट्रोलमध्ये हवच पण आपल्या मनातून आपण इन्फीरियॉरिटी कॉम्प्लेक्स पूर्णपणे काढून टाकायला हव. जर आपलं मन शांत असेल तर अनेक समस्या नाहीशा होतात. आता गंभीर प्रश्न येतो तो म्हणजे बाहेरच्या खाण्याच्या चमचमीत खाण प्रत्येकालाच आवडत. पण हा 2020 सालचा पहिल्या महिन्यात बेकरीचे प्रमाण कमी करून बघा. हवं तर आठवडय़ातून एकदाच मागवा. बघा लगेच महिन्याभरातच तुमच्या वजनात कसा फरक पडतो ते! माझ्या अनेक लेखांमधून मी अनेक वेळा सांगत आलोय की घर बसल्या ‘प्राणायाम’सारखा दुसरा व्यायाम नाही. प्रत्येकाला व्यायामशाळेत जाऊन वजन उचलायची गरज नसते. पण साधं चालणं, थोडा योगा करूनसुद्धा आपल्या तब्येतीत खूप फरक पडतो. मी दर वर्षाच्या शेवटी व नवीन वर्षाच्या सुरुवातीला जे काही सगळीकडे बघत होतो ते या लेखाच्या माध्यमातून सांगितले.
नव वर्षाच्या हेल्दी आणि फिट शुभेच्छा!




























































