धक्कादायक; पोटच्या मुलाने केला आई-वडिलांवर कुऱ्हाडीने हल्ला, आई जागीच ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वयोवृद्ध जन्मदात्यांवर पोटच्या मुलानेच कुऱ्हाडीने वार केले. या हल्ल्यात आई जागेवरच ठार झाली तर वडील गंभीर जखमी झाले आहेत. ही मनाला चटका लावणारी घटना गुरुवारी रात्री नऊ वाजेच्या दरम्यान जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील गोकुळवाडी तांडा येथे घडली आहे. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन आरोपीस ताब्यात घेतले असून बदनापूर न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

आरोपीच्या डोक्यावर परिणाम झाल्याने त्या भरात त्याने हे कृत्य केले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. बदनापूर तालुक्यातील गोकुळवाडी तांडा येथे मोलमजुरी करणारे उत्तम घुमाजी चव्हाण (70) व ठकूबाई उत्तम चव्हाण (60) असे वयोवृद्ध दाम्पत्य वास्तव्यास आहे. त्यांना तीन मुले असून एक मुलगा त्याच्या सासुरवाडी शेगाव येथे राहतो, तर दुसरा शेजारीच राहतो. मात्र तो सध्या उसतोडीच्या कामाला बाहेरगावी गेला आहे. त्यांचा तिसरा मुलगा दिलीप उत्तम चव्हाण (३६) हा काहीसा मनोरुग्ण असून त्याच्या पत्नीने त्याला सोडले आहे.

दरम्यान, 2 जानेवारी रोजी रात्रीचे जेवण झाल्यावर उत्तम चव्हाण आणि ठकूबाई चव्हाण, भारती संजय चव्हाण झोपण्यासाठी गेले होते. तेव्हा मुलगा दिलीप याने त्यांच्यावर कुऱ्हाडीने अमानुषपणे वार केले. या घटनेत आई ठकूबाई ठार झाल्या. तर वडील उत्तम चव्हाण गंभीर जखमी झाले. सदर आरोपी आई वडिलांवर वार करीत असतांना 16 वर्षीय भारती ने आरडाओरड केली व या घटनेबाबत ग्रामस्थांना माहिती दिली. यानंतर गावकऱ्यांनी तात्काळ बदनापूर पोलिसांना संपर्क साधून त्यांना घडलेल्या घटनेची माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहचले असता घरात आई – वडीलांवर वार करून त्याच ठिकाणी बसलेल्या दिलीपने पोलिसांना बघून घराचा दरवाजा आतून बंद केला. पोलिसांनी घरचे पत्रे काढून घरात प्रवेश केला व आरोपी दिलीप यास अटक केली.