
1877 सालापासून सुरू झालेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गेल्या 142 वर्षामध्ये काळानुसार बदल होत गेले. कसोटी, वन डे , टी-20 आणि आता 100 चेंडूंचा सामना असे बदल क्रिकेट प्रकारात झाले. पोशाखांपासून चेंडूपर्यंत आणि खेळाशी निगडित असलेल्या नियमांतही बदल करण्यात आले. आता ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मार्क वॉ याच्याकडून एक सूचना करण्यात आली आहे. त्यानुसार क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात ‘लेगबाईज’ नसावा. तो काढून टाकावा, असे मार्क वॉला वाटते. मार्क वॉ याबाबत पुढे म्हणाला, फलंदाजाच्या हातामध्ये चेंडू टोलावण्यासाठी बॅट असते. त्या बॅटनेच चेंडूला मारायला हवे. बॅटचा स्पर्श चेंडूला झाला नाही, तर मग त्या धावांचा उपयोग काय. त्या संघाला लेग बाईजच्या धावा का मिळाव्यात, असा सवालही पुढे मार्क वॉ याने यावेळी केला आहे.

























































