रेझिंग डे’ निमित्ताने पोलिसांचे चौकार-षटकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘रेझिंग डे’ च्या निमित्ताने मालवण येथील टोपीवाला बोर्डिंग मैदानावर कणकवली उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाअंतर्गत क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मालवण-आचरा-देवगड या संघाने कणकवली- वैभववाडी-विजयदुर्ग या संघाचा एका धावेने पराभव करत रोमहर्षक विजय संपादन केला. अमित हळदणकर (देवगड) यांच्या शेवटच्या निर्णायक षटकामुळे मालवण संघ विजयी ठरला.

रेझिंग डेच्या निमित्ताने सिंधुदुर्ग पोलिसांच्या वतीने कणकवली व सावंतवाडी उपविभागीय कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या सहा पोलीस ठाण्याची क्रिकेट स्पर्धा सुरू आहेत. यातील कणकवली उपविभागातील क्रिकेट सामना मालवण बोर्डिंग मैदानावर शनिवारी सकाळी खेळविण्यात आला. स्पर्धेत मालवण, आचरा व देवगड पोलीस ठाण्याचा एक संघ तर कणकवली, विजयदुर्ग, वैभववाडी पोलीस ठाण्याचा दुसरा संघ आमने सामने होता. या सामन्याला उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नितीन कटेकर हे उपस्थित होते. यावेळी मालवण पोलीस निरीक्षक विनीत चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक सचिन पाटील, वैभववाडीचे डी. जी. बाकरे, विजयदुर्गचे एस. सी. कोळी, कणकवलीचे एस. एस. खंडागळे, ए. एस. बनकर हेही अधिकारी उपस्थित होते.

मालवण-आचरा-देवगड संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित दहा षटकात आठ गड्यांच्या मोबदल्यात 73 धावा केल्या. यात देवेंद्र लुडबे (मालवण) याने 23 धावा, तर सिद्धेश चिपकर (मालवण) याने 19 धावा जमविल्या. कणकवली-विजयदुर्ग-वैभववाडी संघाने आठव्या षटकापर्यंत संथगतीने फलंदाजी केली. मात्र नवव्या षटकात दोन षटकार, दोन चौकारांच्या मदतीने 25 धावा कुटल्या गेल्या. शेवटच्या षटकात सामना रंगतदार स्थितीत पोहचला. सहा चेंडूत 13 धावांची गरज होती.

शेवटच्या चेंडूवर 2 धावा आवश्यक असताना गोलंदाज अमित हळदणकर (देवगड) याने फलंदाजाला धावचित केल्याने मालवण संघ एका धावेने विजयी झाला. कणकवली संघाने 72 धावा केल्या. कणकवली संघातर्फे राकेश चव्हाण (कणकवली) याने 19 धावा, योगेश राऊळ (वैभववाडी) याने 25 धावा, गणेश भोवड (वैभववाडी) याने 29 केल्या. स्पर्धेत पंच म्हणून पोलीस कर्मचारी विल्सन फर्नांडिस तर गुणलेखन विलास टेंबुलकर यांनी काम पाहीले .