पाकड्यांकडून 2019 मध्ये 16 वर्षांत सर्वाधिक शस्त्रसंधीचे उल्लंघन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू-कश्मीरात प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवर पाकड्यांकडून 2019 मध्ये तब्बल 3289 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले गेले. गेल्या 16 वर्षांतील हे सर्वाधिक शस्त्रसंधीचे उल्लंघन आहे. रोज किमान 9 वेळा पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार करीत हिंदुस्थानी लष्कराच्या चौक्या आणि सीमेलगतच्या गावांना टार्गेट केले जात आहे. धक्कादायक म्हणजे जम्मू-कश्मीरातून 370 कलम हटवल्यापासून यात वाढ झाली असून ऑगस्ट ते डिसेंबर 2019 या पाच महिन्यांत 1565 वेळा पाकड्यांनी सीमेवर गोळीबार केल्याचे वृत्त आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाकडे ‘आरटीआय’अंतर्गत शस्त्रसंधी उल्लंघनाच्या वाढत्या घटनांबाबत माहिती विचारण्यात आली होती. गृहमंत्रालयाच्या संचालकांनी याबाबत दिलेल्या माहितीमध्ये ही बाब उघडकीस आली आहे.

शस्त्रसंधी अशी वाढली

  • 2019 मध्ये पाकड्यांनी जम्मू-कश्मीरच्या प्रत्यक्ष नियंत्रणरेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर 3289 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले.
  • 5 ऑगस्ट 2019 ला 370 कलम हटवले. ऑगस्टमध्ये 323 वेळा, सप्टेंबर 308, ऑक्टोबर 398 आणि नोव्हेंबरमध्ये  333 वेळा उल्लंघन. 2019 मध्ये सरासरी रोज 9 वेळा शस्त्रसंधी मोडली. 2019 मध्ये शहीद झालेल्या जवानांची माहिती गृहमंत्रालयाने दिलेली नाही. तसेच 2016 मध्ये शस्त्रसंधीच्या उल्लंघनाचीही माहिती यात नाही.
  • 2018 मध्ये शस्त्रसंधी उल्लंघनाच्या 2936 घटना झाल्या. त्यात 61 जणांचा मृत्यू तर 250 जखमी झाले.
  • 2003 मध्ये हिंदुस्थान-पाक यांच्यात शस्त्रसंधीचा करार झाला. 2004, 2005 आणि 2006 मध्ये शस्त्रसंधी उल्लंघनाची एकही घटना झाली नाही.

8600 बंकर्सचे बांधकाम पूर्ण

प्रत्यक्ष नियंत्रणरेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर 14,400 बंकर्स बांधण्यासाठी 415 कोटी रुपये केंद्र सरकारने मंजूर केले. यातील 8600 बंकर्सचे बांधकाम पूर्ण झाल्याची माहिती गृहमंत्रालयाने दिली आहे.