भारत पेट्रोलियमच्या खासगीकरणाला अधिकार्‍यांचाही विरोध, देशव्यापी संपात होणार सहभागी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) या सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगाचे खासगीकरण करण्याचा केंद्र सरकारचा डाव आहे. याचा बीपीसीएलमधील अधिकारी संघटनेने विरोध केला असून खासगीकरणाविरोधात 8 जानेवारीला होणार्‍या देशव्यापी संपात सहभागी होणार असल्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

खासगीकरणाच्या विरोधासाठी काँफेडरेशन ऑफ महारत्न ऑफिसर असोसिएशन (कॉमको) समवेत फेडरेशन ऑफ ऑईल पीएसयू ऑफिसर (फोपो) या संघटनांनी  नुकतीच संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या वेळी कॉमको-फोपोचे संयोजक मुकूल कुमार आणि इतर नेत्यांची उपस्थिती होती. बीपीसीएल ही सार्वजनिक क्षेत्रातील देशातील चौथी आणि तेल क्षेत्रातील दुसरी सर्वात मोठी कंपनी आहे. गेल्या आर्थिक वर्षात बीपीसीएलमुळे 7132 कोटींचा निव्वळ नफा सरकारी तिजोरीत जमा झाला आहे. नफ्यात असतानाही कंपनीच्या खासगीकरणाचा घाट कशासाठी, असा संतप्त सवाल संघटनेने उपस्थित केला आहे.

भारत पेट्रोलियमच्या संपाला इंडियन ऑईल, ओएनजीसी, हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन, गेल आदी कंपन्यांनीही आपला पाठिंबा दर्शवला आहे.

खासगीकरणामुळे राष्ट्रीय सुरक्षेवर परिणाम होईल!

बीपीसीएलच्या खासगीकरणामुळे राष्ट्रीय सुरक्षा आणि जनहितावर मोठा परिणाम होईल, मच्छीमारांना डिझेलसाठी तसेच ग्रामीण भागात दिली जाणारी केरोसीनची सबसिडी भविष्यात संपुष्टात येईल. याशिवाय देशाची उत्पादक क्षमता, स्पर्धात्मकता,  मनुष्यबळ कौशल्ये कायमस्वरूपी नष्ट होतील, अशी भीती संघटनेने वर्तवली आहे.

कामगार संघटनांच्या देशव्यापी संपाला काँग्रेसचा पाठिंबा!

देशभरातील सर्व कामगार संघटनांनी आणि राष्ट्रीय कामगार संघटनांनी 8 जानेवारीला पुकारलेल्या देशव्यापी संपाला काँग्रेसने संपूर्ण पाठिंबा दिला असल्याचे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी सांगितले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारने चालविलेल्या दडपशाही, कामगारविरोधी कायदे, सार्वत्रिकीकरण, पेन्शन योजना, भाववाढ, बेकारी, विद्यार्थ्यांवरील हल्ले, मालकधार्जिणे कायदे व इतर मागण्यांसाठी देश एकजुटीने उभा राहत आहे. मुंबईमधील सर्व विविध संघटनांच्या वतीने ठिकठिकाणी निदर्शने करण्यात येणार आहेत. या सार्वत्रिक संपामध्ये काँग्रेसचे सर्व वरिष्ठ नेते, आजी-माजी खासदार, आमदार, नगरसेवक तसेच पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत, असेही एकनाथ गायकवाड यांनी सांगितले.