
रविवारी रात्री जेएनयु विद्यापीठात विद्यार्थी आणि शिक्षकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा देशभरातून निषेध नोंदवला जात आहे. देशातील अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये याविरोधात आंदोलन पुकारण्यात आले आहे. मुंबई, पुणे, दिल्लीच्या विद्यार्थ्यांनी ठिकठिकाणी मोर्चे काढून आपला निषेध नोंदवला आहे.
मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी गेट वे ऑफ इंडियावर निदर्शने केली. तसेच अलीगढ मुस्लिम विद्यापीठातील विद्यार्थ्यांनीही आंदोलन केले आहे. मुंबईत गेटवे ऑफ इंडियावर सुरू असलेल्या आंदोलनास्थळी अभिनेता सुशांत सिंह पोहोचला आहे.
बँगलोरमध्ये टाऊन हॉलमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. तसेच हैद्राबदमध्येही उस्मानिया विद्यापीठाच्या विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. कोलकाताच्या जादवपुर विद्यापीठातील विद्यार्थींनी मोर्चा काढला आहे. दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थ्यानी आवारात दोन वाजल्यापासून आंदोलन सुरू केले आहे.

























































