
राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या नगर जिल्ह्यातील पिंपळगावरोठा ता पारनेर येथील श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थानचा वार्षिक यात्रोत्सव 10 जानेवारी पासून सुरू होत आहे. यात्रेत लाखो भाविक सहभागी होतील याचा अंदाज बांधुन देवस्थान ट्रस्ट प्रशासन, ग्रामस्थ, मानकरी यांनी नियोजन पुर्ण केले असून या नियोजनाचा आढावा कोरठण येथे प्रशासन, देवस्थान ट्रस्ट, मानकरी यांच्या संयुक्त बैठकीत पार पडला.
या बैठकीला देवस्थानचे अध्यक्ष अॅड पांडुरंग गायकवाड, उपाध्यक्ष गंगाराम बेलकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश गवळी, गटविकास अधिकारी माने, आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे शासकीय अधिकारी,मानकरी, ग्रामस्थ उपस्थित होते
यावेळी कोरठण यात्रेसाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीमधून दरवर्षी पिंपळगाव रोठा ग्रामपंचायतीला अनुदान देण्याची तरतूद करण्याचा ठराव मांडण्यात आला. पोलिसांकडून चोख बंदोबस्त, वाहतूक व्यवस्था आदी बाबींचे नियोजन करण्यात आले असुन एसटी कडून विविध ठिकाणाहून 40 एस टी बस कोरठणसाठी सोडण्यात येणार आहेत.
आरोग्य विभागाकडून वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय पथक, रूग्णवाहिका आदी व्यवस्था, कोरठणला जोडलेल्या रस्त्यांची तातडीने दुरूस्ती, रस्त्यावर दिशादर्शक फलक लावणे, अखंडित वीजपुरवठा, पिण्याचे पाणी, वाहनतळ, नियंत्रण कक्ष , अग्निशमन व्यवस्था आदी बाबींचे नियोजन करण्यात आले, गारखिंडी घाटात संरक्षक कठडे लावण्याबाबत यावेळी सुचना देण्यात आल्या.
बेल्हे व ब्राम्हणवाडा येथील मानाच्या काठ्यांच्या मिरवणूकीनंतर काठ्यांची शासकीय महापुजा झाल्यानंतर दोन्ही काठ्यांच्या कळस व देवदर्शनानंतर इतर गावच्या मानाच्या काठ्या, पालख्यांच्या मिरवणुकीनंतर 3 दिवसांच्या यात्रेची सांगता होईल.

























































